मुंबई : अजित पवारांनी काही वेळापूर्वीच केलेला दावा हा शरद पवार यांनी फेटाळून लावला आहे. भाजपसोबत युती करण्याचा प्रश्नच नाही. शिवसेना आणि काँग्रेससोबत युती करुन सरकार स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने एकमताने घेतला आहे. अजित पवार यांचं हे विधान चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे. लोकांमध्ये गोंधळ आणि चुकीचा समज निर्माण करण्यासाठी हे वक्तव्य केलं गेल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या बड्या नेत्यांचे आभार मानल्यानंतर अजित पवार यांनी धक्कादायक ट्विट केलं. मी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहे आणि कायमच राष्ट्रवादीसोबतच राहणार आहे. पवार साहेब हेच माझे नेते आहेत. आमची भाजप-राष्ट्रवादीची युती पुढची ५ वर्ष महाराष्ट्राला स्थिर सरकार देईल. हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी काम करेल, असं अजित पवार म्हणाले.



या ट्विटनंतर लगेचच अजित पवार यांनी दुसरं ट्विट केलं आहे. काळजी करण्याची काहीही गरज नाही. पण थोडा संयम ठेवला पाहिजे. तुमच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद, असं अजित पवार म्हणाले.



अजित पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटमध्येही बदल केले आहेत. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस असं अजित पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं आहे.