उद्धव ठाकरेंच्या काळात आनंदाने, तर पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात... अजित पवारांचा गौप्यस्फोट
दोन वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं, आता मुख्यमंत्री म्हणून 2024 नाही तर आताच क्लेम करणार असं सांगत अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आधी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि नंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंबरोबर (Uddhav Thackeray) सत्तेत काम केलं. दोघांच्या काळात आपण उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. पण ठाकरेंच्या काळात आम्ही आनंदाने तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आम्ही नाईलाजाने काम केलं असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. सकाळ माध्यम समूहाच्या 'दिलखुलास दादा' या मुलाखतीत अजित पवार यांनी दिलखुलास उत्तरं दिली.
'तेव्हा नाईलाजाने काम केलं'
पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात आम्ही चार वर्ष काम केलं. 2019 ला महाविकास आघाडी झाली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात आम्ही एकत्रितपणे चांगलं काम केलं. कधी समाधानाने तर कधी नाईलाजाने काम करावं लागतं, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आम्ही नाईलाजाने काम केलं असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.
'आताच क्लेम करणार'
2004 मध्ये मुख्यमंत्रीपद मिळेल इतके राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले होत, त्यावेळी आम्ही आर आर पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचं ठरवलं होतं, पण दिल्लीत काय घडलं माहित नाही, असंही अजित पवार यांनी सांगितलं. दोन वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं, आता 2024 ला मुख्यमंत्रीपदावर दावा करणार का? या प्रश्नावर अजित पवार यांनी क्लेम 2024 का? आताच करणार असं सूचन विधान केलं आहे.
भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना बळ
गेल्या काही दिवसात अजित पवार हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात होतं. चाळीस समर्थक आमदारांच्या सह्याही त्यांनी घेतल्याची चर्चा होती. पण स्वत: अजित पवार यांनी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीसाठी काम करणार असल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला होता. पण आता मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक विधान करुन अजित पवार यांनी यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना बळ दिलं आहे.
शिंदेची नाराजी आधीपासून माहित होती
एकनाथ शिंदे यांची नाराजी आपल्याला आधीपासूनच माहित होती, त्यांच्याबद्दल अधून-मधऊन कानावत येत होतं. त्यांच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं, आम्ही ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्याही कानावर घातलं होतं, असं अजित पवारांनी सांगतिलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवंद्र फडणवीस यांच्या भेटीचीही खिल्ली उडवली. 'एका नेत्याच्या धर्मपत्नीने सांगितलं की माझे पती वेशभूषा बदलून बाहेर जायचे. त्यांनाही माहित नव्हतं की कशासाठी जातायत. जेव्हा पत्नीला घरी ठेवून पुरूष बाहेर पडतो, तेव्हा त्यातून दोन तीन अर्थ निघतो. आणि त्यानंतर अनेकांनी सांगितलं की ते दोघे आधी भेटले. याचा अर्थ ही गोष्ट एका दिवसात झालेली नव्हती' असंही अजित पवार यांनी सांगितल.