`आम्हाला काय म्हणायचं हे अजितदादांनी फोटोतून दाखवून दिलंय`
महाराष्ट्रात दोन नव्हे तर तीन मुख्यमंत्री असल्याचा दावाही विनायक मेटे यांनी केला.
किरण ताजणे, झी मीडिया, मुंबई: उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवार यांनी ट्विट केलेल्या छायाचित्राची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी आपल्याचा हातात स्टेअरिंग असल्याचे म्हणू द्या, पण अजितदादांनी फोटो ट्विट करून सगळं सांगितलं आहे. आम्हाला काय म्हणायचं ते अजित पवार यांनीच सांगितले आहे. अजित पवार हे मंत्रालयात बसून काम करतात. सध्या महाराष्ट्राचं स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. परंतु हे सरकार दुसरं कोणी पाडायीच गरज नाही, ते स्वत:च पडतील, असे विनायक मेटे यांनी म्हटले.
ये दोस्ती.... हम नही तोडेंगे... संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तसेच महाराष्ट्रात दोन नव्हे तर तीन मुख्यमंत्री असल्याचा दावाही विनायक मेटे यांनी केला. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि शरद पवार हे तीन मुख्यमंत्री सध्या कारभार पाहत पाहेत. दुर्दैवाने काँग्रेस या सगळ्यातून बाहेर आहे. आपण सरकारमध्ये आहोत, हे काँग्रेस स्वत:ही मान्य करत नाही. काँग्रेस पक्ष फक्त नावापुरता सरकारमध्ये आहे. खरे बघायला गेले तर दोनच पक्ष सरकारमध्ये असल्याचेही मेटे यांनी म्हटले.
अजित पवारांनी ट्विट केलेल्या फोटोवरून वाद का झाला?
उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सामना दैनिकाला मुलाखत दिली होती. यावेळी आमचे सरकार तीनचाकी रिक्षा असली तरी त्याचे स्टेअरिंग व्हील माझ्या हातात असल्याचे उद्धव यांनी म्हटले होते. मात्र, आज अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा इलेक्ट्रीक कारमधील एक छायाचित्र शेअर केले. यामध्ये कारचे स्टेअरिंग अजित पवार यांच्या हातात आहे. त्यामुळे अजित पवारांना नेमके काय म्हणायचे आहे, याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.