मुंबई : अजित पवारांनी सोमवारी काही आमदारांसमोर मन मोकळं केलं. आणि प्रथमच या सत्तासंघर्षातील अजित पवारांची एक बाजू समोर आली. शिवसेनेबरोबर मुख्यमंत्रिपदावरून तिढा वाढल्यानंतर भाजपकडून राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह सत्तेच अर्धा वाटा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यामुळे भाजपनं सत्तास्थापनेचं राज्यपालांचं निमंत्रण नाकारलं आणि वेट अँण्ड वॉचची भूमिका घेतली. भाजपच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीच्या पुण्यात झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याशीही चर्चा झाली होती. याशिवाय, शरद पवार यांच्या मर्जीनं भाजपच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची सूत्रं आपल्या हाती आली होती, असा दावा अजित पवारांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, शिवसेना आणि काँग्रेसबरोबर चर्चा सुरु झाली. ही चर्चा फिस्कटेल असं राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटत होतं. मात्र काँग्रेसचे नेते तहात पुढे जाताना शिवसेनेशी जुळवून घ्यायला लागले. तसेच काँग्रेसच्या मागण्या शिवसेनेकडून मान्य केल्या जाऊ लागल्या.


शिवसेना-काँग्रेसबरोबरची बोलणी यशस्वी होऊ लागल्याची चिन्हं दिसताच अजित पवारांनी राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असं अजित पवारांचं म्हणणं आहे.


एकूणच, शिवसेना-काँग्रेसबरोबरची बोलणी पुढे गेली आणि भाजपबरोबर जाण्याचा प्लान अपेक्षेनुसार यशस्वी होणार नाही असे वाटल्यानंच अजित पवारांनी फडणवीसांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि शुक्रवारी रात्रभर पुढच्या घडामोडी घडल्या.