मुंबई : महाविकास आघाडी सरकारने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात आमदारांच्या विकासनिधीत वाढ करून सर्वांना खूष केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना २०११ नंतर आमदारांच्या निधीत वाढ केली असल्याचे सांगत एक कोटी रुपयांची वाढ करत असल्याची घोषणा केली. यानंतर सर्वच आमदारांनी बाके वाजवत अजितदादांचे स्वागत केले होते. मात्र, अर्थसंकल्पावरुन विरोधकांकडून टीका होत आहे. राज्यात समतोल साधला गेला नाही. विकासनिधी कमी देण्यात आला आहे. यावर आज विधानसभेत उत्तर देताना अजित पवार यानी अनेक वृत्तपत्रांचा दाखला दिला. त्यांनीही मंदी असताना बजेटचे स्वागत केले आहे. विरोधक उगाचच टीका करत आहे. मात्र, लोकसाहीत टीकेचे स्वागत आहे. त्याचवेळी प्रादेशिक समतोलाचा आरोप फेटाळून लावला. दरम्यान, विरोधी बाकांकडे नजर टाकत आमदारांना बजावले, तीन कोटींचे दोनच कोटी करतो! मग समतोल साधला जाईल, असे मिश्किलीने म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी प्रादेशिक समतोलाचा आरोप फेटाळून लावत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. अर्थसंकल्पात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कुठे दिसत नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करतात. मात्र, आमच्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. विरोधकांनी उघड्या डोळ्यांनी अर्थसंकल्प पाहिला तर बऱ्याच गोष्टी दिसतील, असे अजित पवार यांनी सांगत फडणवीस आणि भाजपला चिमटा काढला. तसेच वृत्तपत्र वाचावे आम्ही त्यांना काही सांगायला गेलेलो नाही.


दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात आमदारांच्या विकासनिधीत वाढ केली. आमदारांच्या निधीत एक कोटींनी वाढ होऊन तो आता तीन कोटी झाला आहे. आता, ठाकरे सरकार आमदारांच्या वाहनचालकालाही दरमहा १५ हजार रुपये वेतन देणार आहे. याबाबतचे विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता वाहनचालकांनाही सरकार पगार देणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर ६.६० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. तसेच, आमदार २५ हजार रुपये महिना पगारावर वैयक्तिक सहाय्यकाला नोकरीवर ठेवू शकतात.