राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर अक्षय कुमारचं प्रत्युत्तर
गुढी पाडव्यानिमित्त झालेल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी अभिनेता अक्षय कुमारवर टीका केली होती.
मुंबई : गुढी पाडव्यानिमित्त झालेल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी अभिनेता अक्षय कुमारवर टीका केली होती. राज ठाकरेंच्या या टीकेवर अक्षय कुमारनं प्रतिक्रिया दिलेली आहे. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेमुळे मला वाईट वाटलं नाही. प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य असतं, असं अक्षय कुमार म्हणाला आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये अक्षय कुमारनं हे वक्तव्य केलं आहे.
राजकारणात जायला आवडेल का?
राजकारणात गेलो तर त्या पदाला न्याय देण्यासाठी पूर्ण वेळ द्यावा लागेल, असं अक्षय कुमार म्हणाला आहे. मनात आणलं तर कमर्शिअल चित्रपटांना प्राधान्य दिलं असतं. पण समस्येपेक्षा समस्येचं उत्तर शोधणं जास्त महत्त्वाचं आहे, अशी शिकवण पालकांनी दिली म्हणून असे चित्रपट बनवायला आवडतं, असं अक्षय म्हणाला.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
अक्षय कुमारचे चित्रपट सरकारचा प्रचार करणारे वाटतात. अक्षय कुमार मनोज कुमार बनण्याचा प्रयत्न करतोय. मनोज कुमारला भारत कुमारही म्हणलं जायचं. अक्षय कुमार देशभक्तीच्या गोष्टी करतो पण तो स्वत: भारताचा नागरिक नाही. त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती.