बीएमसी अधिकाऱ्यांसाठी खास `मिशन मंगल` शो, अक्षयचा मराठीतून संवाद
अक्षय कुमार जेव्हा मराठीत बोलतो...
प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई : खिलाडी अक्षय कुमारच्या 'मिशन मंगल' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच बोलबाला सुरु आहे. दादरच्या प्लाझा थिएटरमध्ये बीएमसी कर्मचाऱ्यांसोबत 'मिशन मंगल'च्या टीमनं खास कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी इंग्रजीतून भाषण करू पाहणाऱ्या बीएमसी अधिकाऱ्याला, 'मला मराठी समजतं, मराठीतच बोला' म्हणत अक्षयनं चांगलीच फिरकी घेतली.
मुंबईचं प्लाझा सिनेमागृह हे तसं मराठीजनांसाठी प्रसिद्ध. मात्र खिलाडी अक्षयकुमारसारखा बॉलिवूडचा सेलिब्रिटी इथं आल्यानंतर एका बीएमसी अधिकाऱ्याला इंग्रजीतून भाषण करायची हौस आली. मात्र अधिकाऱ्याचं इंग्लिश विंग्लिश भाषण सुरू पाहून अक्षयनेच त्यांना अस्सल मराठीत 'मला मराठी चांगलं समजतं तुम्ही मराठीतच बोला' असा प्रेमळ टोला लगावला आणि अधिकारी मराठीत बोलू लागले.
मिशन मंगलच्या निमित्तानं खिलाडी अक्षय कुमारने प्लाझाला खास भेट दिली. बीएमसी अधिकाऱ्यांसाठी मिशन मंगलचा एक खास शो ठेवण्यात आला होता. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह बीएमसीचे अनेक अधिकारी शो ला आले होते. पहाटे चार वाजता घराबाहेर पडताना रस्यावर होणाऱ्या बीएमसी कर्मचाऱ्यांच्या भेटीची आठवण अक्षयने यावेळी सांगितली.
महिला अधिका-यांनी यावेळी आपले कामातले अनुभव सांगितले, तर महिला अधिकाऱ्यांचा उत्साह पाहून आपल्याला पुढच्या चित्रपटासाठी स्क्रिप्ट मिळाल्याचं सांगितलं. बॉलिवूडच्या या खिलाडीने आता पुढचा चित्रपट बीएमसीतील महिला अधिकाऱ्यांवर काढला तर नवल वाटायला नको.
एकूणच मराठमोळ्या अधिकाऱ्यांसोबत खिलाडीची मिशन मंगलची ही भेट बीएमसी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा उत्साह वाढविणारी ठरली.