बागेश्री कानडे, झी २४ तास, मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात आज तीनही महिला डॉक्टर आरोपींना सशर्त जमीन मंजूर करण्यात आला आहे. तिघींना प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. तीनही आरोपींना त्यानंतर एका आठवड्याच्या आत हमीदार द्यावा लागणार आहे. त्यानंतर जामिनाची मुदत वाढून घेता येईल, असंही न्यायालयानं बजावलंय. भक्ती मेहेर, अंकिता खंडेलवाल आणि हेमा अहुजा अशी या प्रकरणातल्या आरोपींची नावं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तीनही महिला आरोपींना एक दिवसाआड गुन्हे अन्वेषण विभागाला हजेरी लावण्यास न्यायालयानं बजावलंय. तसंच त्यांना मुंबई सोडून बाहेर जाता येणार नाही. तसंच तिघींनीही आग्रीपाडा पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेश करू नये, अशी बंदी त्यांच्यावर घालण्यात आलीय. 


भक्ती मेहेर, अंकिता खंडेलवाल आणि हेमा अहुजा या तिघींचा परवाना ट्रायल होईपर्यंत निलंबित करण्यात आलाय. नायर रुग्णालयाच्या परिसरात जाऊ नये, असंही त्यांना बजावण्यात आलंय. 



आरोपींकडून पुरावे नष्ट करण्याचा किंवा साक्षीदारांना फितवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती मृत डॉ. पायल तडवीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली होती.


मुंबईतल्या नायर रुग्णालयातल्या २३ वर्षीय महिला डॉक्टर पायल तडवी हिनं वरिष्ठांच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली होती. डॉ. पायल तडवी ही मूळची जळगावची होती. तीनही आरोपींवर रॅगिंग तसंच आत्महत्तेस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.