राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित
पुढील आदेश येईपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी याबाबत घोषणा केली आहे.
राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या १० ऑगस्ट २००५च्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक इत्यादी स्वरुपाचे सर्व कार्यक्रम मंगळवार १७ मार्चपासून स्थगित केले आहेत.