मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करावं, असं आवाहन खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिलं होतं. हनुमान जयंतीला मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केले नाही, तर आम्ही मुंबईला मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठण करू, असा इशारा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानुसार 23 एप्रिलला मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आमदार रवी राणा यांनी घोषित केलं आहे. आमच्यासोबत आमचे 500 समर्थक सुद्धा 23 एप्रिलला मातोश्रीवर जाणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे. तर मुंबईची लेक म्हणून मातोश्रीवर जाणार असा निर्धार खासदार नवनीत राणा यांनी केलाय. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. 


नवनीत राणा यांचा निर्धार
त्यांनी मला धमकी दिली आहे की मुंबईत आलात तर परत स्वत:च्या पायावर जाणार नाही म्हणून, पण त्यांना माहित नाही की मी मुंबईचीच मुलगी आहे आणि आता विदर्भाची सून आहे असं उत्तर खासदार नवनीत राणा यांनी दिलं आहे. 


मीच त्यांना आव्हान दिलं होतं की तुम्ही मला वेळ द्या, तारीख द्या पण त्यांनी दिलं नाही म्हणून आम्ही आमची तारीख दिली, त्या तारखेला आम्ही मुंबईत मातोश्रीच्या बाहेर येऊन हनुमान चालिसाचं पठण करणार आणि देवाचं नाव घेण्यासाठी तयारी करावी लागत नाही, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. 


मागच्या वेळी आम्हाला स्थानबद्ध करण्यात आलं होतं, तसं यावेळी पोलिसांनी करु नये, कारण आम्ही काही प्रदर्शन करायला चाललो नाही, की आम्ही दहशतवादी नाही. मी मुंबईची मुलगी म्हणून तिथे जाणार असून मला पूर्ण अधिकार आहे, कोणी थांबवण्याचा प्रयत्न करु नये असं आवाहनही नवनीत राणा यांनी केलं आहे. 


किशोरी पेडणेकर यांचं प्रत्युत्तर
खासदार नवनीत राणा यांनी दिलेल्या इशाऱ्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हा तर मुर्खपणाचा बाजार आहे, अमरावतीतला बाजार करा, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.


मातोश्रीवर विरोध होणार हे त्यांना माहित आहे, बोगस सर्टिफिकेटवर खासदार बनून इथे जर गडबड करणार असतील तर त्याना माहित आहे शिवसैनिक येऊच देणार नाही. आणि येणार म्हणजे काय तुमच्या काय पिताश्रीने ठेवलं आहे का मातोश्री. मातोश्री आमच्या पिताश्रींचं आहे असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.