`नीट आणि जेईईच्या परीक्षार्थींना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी द्या`
कोरोनाच्या संकटामुळे सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची मुभा आहे
मुंबई: नीट आणि जेईईची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. आपण यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी नीट आणि जेईईच्या परीक्षार्थींना हॉलतिकीट दाखवून रेल्वे प्रवासाची मुभा देता येऊ शकते, असे पीयूष गोयल यांनी सांगितले. मात्र, त्यासाठी राज्य सरकारकडून रेल्वे खात्याला तसा प्रस्ताव पाठवला जाण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे खात्याला तशी विनंती करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
'अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात, घरी बसूनच देता येणार परीक्षा'
कोरोनाच्या संकटामुळे सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे यंदा नीट आणि जेईईच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, मुंबई महानगर परिसरातील नीट आणि जेईईच्या परीक्षार्थीना ट्रेनने प्रवास करण्याची मुभा मिळाल्यास त्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचणे शक्य होईल. त्यामुळे राज्य सरकारने आपली जबाबदारी ओळखून या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे खात्याकडे तसा प्रस्ताव पाठवावा, असे आशिष शेलार यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'वर राहुल गांधींची टीका, म्हणाले...
काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात JEE आणि NEET ची परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार येत्या १३ सप्टेंबरला NEETची परीक्षा होणार आहे. तर JEE ची परीक्षाही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या दोन्ही परीक्षांना देशभरातून अनुक्रमे ९.५३ लाख आणि १५.९७ लाख विद्यार्थी बसले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे यापूर्वी दोनवेळ या परीक्षांची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता या परीक्षा होणारच, या भूमिकेवर सरकार ठाम आहे.