मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी या उत्सवातून काढता पाय घेतला आहे. कोरोना व्हायरसचं आव्हान पाहता नाईलाजास्तव आणि समाजहितासाठी म्हणून मानाची मंडळं या निर्णयावर पोहोचली आहेत. यातच आता नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असणाऱ्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून यंदाच्या वर्षी हे पर्व साजरा न करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


अतिशय स्तुत्य असं पाऊल उचलत मंडळातर्फे कोरोना व्हायरसच्या या आव्हानाच्या पर्वात गणेशोत्सवाच्या काळात रक्त आणि प्लाझ्मा दान करण्यासाठीचे कॅम्प सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळं मंडळाच्या या निर्णयावर सध्या कौतुकाच्या वर्षाव करण्यात येत आहेत. 


यापूर्वी मुंबईतील बऱ्याच प्रतिष्ठीत मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक भान जपत उंच गणेशमूर्ती न आणण्याचा निर्णय घेतला, तर काही मंडळांनी गणेशोत्सव अगदी साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये गणेशगल्ली, नरेपार्क, रंगारी बदक चाळ, जीएसबी अशा गणेशोत्सव मंडळांचा समावेश आहे. 


काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गणेश मंडळांना यंदाचा उत्सव साधेपणाने साजरे करण्याचं आवाहन केलं होतं. होळीनंतर राज्यात कोरोनाचं संकट आले आहे. यानंतर सर्वधर्मीयांनी सरकारला सहकार्य केले आहे. आपण वारी सुरक्षित पार पाडतोय. तसाच गणेशोत्सवही सुरक्षेचे भान राखून साजरा झाला पाहिजे. उद्या तुम्ही उत्सव केला आणि तो विभागच कंटेनमेंट झोन झाला तर मग अनेक अडचणी उभ्या राहतील. त्यामुळे सुरक्षित उत्सव साजरा होणे गरजेचे आहे. त्यामुळे गणेशमूर्ती दोन जणांना उचलता येईल अशीच बनवावी. जेणेकरून सुरक्षेचे अनेक प्रश्न सुटतील, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.