शिवसेनेसोबत जाहीर वाद टाळण्याच्या अमित शहांच्या सूचना
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा अपयश आलंय. अशावेळी...
मुंबई : दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी प्रदेश भाजपासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेशी समोपचारानं घेण्याचं धोरण ठरवलंय. मंगळवारी, रात्री उशिरा अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. अमित शाहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह राज्यातील नेत्यांबरोबर मंगळवारी रात्री उशिरा सह्याद्री अतिथी गृहावर तब्बल अडीच तास चर्चा केली. या बैठकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल, संघटन मंत्री विजय पुराणिक उपस्थित होते तर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार काही काळ सहभागी झाले होते.
पाच राज्यांच्या निवडणुकींमध्ये भाजपचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय परिस्थतीचा आढावा यावेळी घेण्यात आला. विशेषत: तीन राज्यातील सत्ता गेल्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेबद्दल तूर्तास तरी पक्षानं जाहीर वाद टाळत सामोपचारानं घेण्याची भूमिका घेण्याचं निश्चित करण्यात आलं.
ग्रामीण भागात भाजपला इतर राज्यात निवडणुकीत बसत असलेला फटका, राज्यातील दुष्काळी परिस्थती, मध्य प्रदेश आणि छ्त्तीसगड या राज्यातील कांग्रेस सरकारनं केलेल्या कर्जमाफी विषयीही या बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा अपयश आलंय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप जोमानं कामाला लागलंय.