COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेल्या सव्वा तासापासून चर्चा सुरू आहे. सुरुवातीला फक्त अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्येच चर्चा झाली आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेही या चर्चेत सहभागी झाले आहेत. आगामी लोकसभाच नव्हे तर विधानसभा निवडणुकाही शिवसेनेसोबत युती करून लढवणार असल्याचा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी झी २४ तासला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केलाय. झी २४ तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांनी अमित शाह यांची मुलाखत घेतली. उद्धव ठाकरेंशी चर्चा करून नाराजी दूर करण्यात यश येणार असा विश्वासही त्यांनी या विशेष मुलाखतीत व्यक्त केलाय. आत्ताच काय यापुढेही शिवसेनेसोबत लोकसभा-विधानसभा निवडणूक लढू असं अमित शाहंनी म्हणलं.


२०१४ सालची लोकसभा निवडणूक एकत्र लढल्यानंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती तुटली आणि ते वेगळे लढले. पण निवडणुकीनंतर दोघंही एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली. २०१४ मध्ये सत्ता आल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीचे वाद सुरु आहेत. भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि उद्धव ठाकरेंची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.


संपर्क फॉर समर्थन


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. भाजपच्या संपर्क फॉर समर्थन या अभियानासाठी शाह मुंबईत आलेत. या लोकसंपर्क अभियान दौऱ्यासाठी मुंबईत पोहचताच अमित शाह यांनी वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात बैठक घेतली. शाह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि विनोद तावडे यांच्यासह बडे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर संपर्क फॉर समर्थन अभियानासाठी अमित शाह अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिच्या घरी पोहचले. यावेळी शाह यांनी माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर शाह यांनी रतन टाटा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. 


आताच काय यापुढेही शिवसेनेसोबतच लढू! अमित शाह यांना विश्वास