दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : लोअर परळच्या पेलेडियम या सप्ततारांकीत हॉटेलमध्ये शनिवारी रात्री एक भेट झाली...तशी ही भेट गोपनीय नव्हती, किंवा अगदी ठरवून ही झाली नव्हती..तरीही या भेटीत खूप सहजता होती....पण आता या भेटीमुळे अनेकांच्या  भुवया उंचावल्याहेत आणि उगाचच भोळ्या आशाही पल्लवित झाल्याहेत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी माणसाला खरंतर जे राज आणि उद्धव ठाकरेंकडून अपेक्षित आहे, मात्र ते या दोघांचे चिरंजीव अमित आणि आदित्य यांना करणं सहज शक्य झालंय... आम्ही ठाकरे कुटुंबातल्या सलोख्याबद्दल बोलत आहोत. मुंबईतल्या सेंट रिजिस, पलेडियम या सप्ततारांकित हॉटेलमध्ये शनिवारी रात्री ठाकरेंची चौथी पिढी म्हणजे अमित आणि आदित्य एकमेकांना भेटले...रात्री अकरा ते साडेबारा अशा तब्बल दीड तास चाललेल्या या भेटीत दोघांनी एकत्र जेवण घेतलं, आणि अगदी दिलखुलास गप्पाही झाल्या...या भेटीत कुठलंही राजकारण नव्हतं, ना कसला आड पडदा !!! सगळं कसं हलकंफुलकं, मोकळं ढाकळ...या दोघांना एकत्र आणणारा दुवा ठरला तो म्हणजे यांचं फुटबॉलप्रेम...


ठाकरे घराण्याची ही युवा पिढी फुटबॉल खेळाची आणि त्यातल्या जागतिक कीर्तीच्या प्लेयर्सची नि:स्सीम चाहती आहे. सध्या मुंबईत फुटबॉल फिवर सुरू आहे. प्रीमियर लीग फुटबॉल या आंतराष्ट्रीय दर्जाच्या सामनयांसाठी रोनाल्डिनो, रायन गिग्स, डेको हे आणि अनेक जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू सध्या मुंबईत दाखल झाले आहेत. अमित ठाकरे हे या स्पर्धा आयोजनात पडद्यामागचे मुख्य सूत्रधार आहेत. तसेच त्यांचा संघही या स्पर्धेत सहभागी झालाय. 


मुंबई, बंगळुरूत होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना दुबईत एक ऑक्टोबरला होणार आहे. मुंबईत असलेल्या फुटबॉलपटूंचा मुक्काम पलेडियम हॉटेलमध्ये आहे. त्यांच्या व्यवस्थेवर अमित यांचे विशेष लक्ष आहे. त्यांनी रोनाल्डिनो आणि डेको यांना श्री सिद्धीविनायक मंदिरातही नेलं होतं. अमितप्रमाणे आदित्य यांनाही फुटबॉलमध्ये विशेष रुची आहे. ते मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे शनिवारी रात्री ते फुटबॉलपटूंना भेटण्यासाठी पलेडियम हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी त्यांची अमित यांच्याशी भेट झाली. आणि पुढे दोघांमध्ये झालेला संवाद हा प्रत्यक्षदर्शींनी अक्षरश: डोळ्यात साठवून ठेवला. 


अमित नुकतेच एका दुर्धर आजाराचा सामना करून त्यातून बाहेर आले आहेत. गेल्या आठ महिन्यांचा काळ हा अमित यांच्यासाठी अत्यंत खडतर आणि त्यांची कसोटी पाहणारा होता...आता ते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत...नव्या उमेदीने कामालाही लागलेत...फुटबॉल स्पर्धेचा हा इव्हेंट त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे...अशा वातावरणात अमित-आदित्य मधला संवाद जणू दुग्धशर्करेचा योग जुळून आल्याचं मानलं जातेय...आणि यानिमित्तानं राज-उद्धव यांनी पुन्हा एकत्र यावं अशी भोळी अपेक्षा बाळगून असलेल्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्याहेत..