सेलिब्रिटी ट्विट प्रकरणावर अमृता फडणवीसांचं ट्विट
पुन्हा एकदा ट्विटची चर्चा
मुंबई : शेतकरी आंदोलनावरील वाद काही थांबायचं नाव घेत नाही. या प्रकरणात जगभरातील लोकप्रिय स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर अनेक कलाकारांनी ट्विट केलं. या मुद्यावरून सेलिब्रिटी ट्विट प्रकरणात कलाकारांच्या ट्विटची सरकार चौकशी करणार आहे. या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.
अमृता फडणवीस यांनी काय म्हटलंय ट्विटमध्ये
अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, महाराष्ट्र सरकारने कलाकार खास करून भारतरत्न पुरस्कार प्राप्त लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या ट्विटच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ज्यांनी फक्त शांत आणि एकत्र राहण्याची विनंती ट्विटमध्ये केली होती.
अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर आणि विराट कोहली यांच्या सहीत अन्य सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला गेल्यानंतर भारतीय सेलिब्रिटींनी एका आशयाचे ट्वीट केले होते.
या सेलिब्रिटींच्या ट्वीटचे बरेचसे शब्द कॉमन होते. #IndiaTogether आणि #indiaAgainstPropganda या हॅशटॅगचा वापर करत ट्वीट केले. भारताचे हे अंतर्गत प्रकरण असल्याचे त्यांनी म्हटले. या सेलिब्रिटींनी दबावात येऊन ट्वीट केले. त्यामुळे याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी कॉंग्रेसने केली. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले.