Crime News: मुंबईत एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून, मुंबईत रिक्षा चालवण्याचं काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव इंद्रजित आहे. बलात्कार करण्याआधी तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर आरोपीने तरुणीला कोणाकडेही या घटनेची वाच्यता करु नकोस सांगत धमकावलं होतं. 


प्रकरण समोर कसं आलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांनी तरुणीच्या पोटातून रक्त वाहू लागलं होतं. दोन महिन्यांपूर्वीच तरुणीची डिलिव्हरी झाली होती. रक्तस्त्राव होऊ लागल्यानंतर कुटुंब तरुणीला घेऊन रुग्णालयात पोहोचले. तरुणीच्या शरिरावरील जखमांचे व्रण पाहिल्यानंतर डॉक्टरांनी तिची विचारपूस केली. यावेळी तरुणीने सगळा घटनाक्रम सांगितलं. यानंतर डॉक्टरांनी तात्काळ पोलिसाना कळवलं. पोलिसांनीही याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला. 


गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, ती सीबीडी बेलापूरला आपल्या मावशीच्या घरी गेली होती. तिथून तिने गोरेगावला जाण्यासाठी रिक्षा बूक केली होती. पण आरे कॉलनीत पोहोचताच रिक्षाचालक तरुणीला घेऊन एका निर्जनस्थळी गेला. 


निर्जनस्थळी नेल्यानंतर आरोपी इंद्रजीतने तरुणीला मारहाण केली. नंतर त्याने तरुणीवर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर त्याने जर या घटनेबद्दल कोणाला सांगितलं तर वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली. या घटनेनंतर आरोपी इंद्रजीतने पळ काढला होता. इंद्रजीत मुंबईत न थांबता उत्तर प्रदेशात फरार झाला होता. 


तरुणीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाच्या मालकाला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने घटना घडली त्यादिवशी इंद्रजीत रिक्षा चालवत होता अशी माहिती दिली. यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस उत्तर प्रदेशात पोहोचले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलीस आता आरोपीला कोर्टात हजर करणार आहेत.