पाणी वाचवण्याची भन्नाट आयडिया; आनंद महिंद्रा यांच्या ट्विटने फळफळले मुंबईकर तरुणाचे नशीब
Anand Mahindra Viral Post: आनंद महिंद्रा यांच्या एका आयडियाने मुंबईच्या तरुणाचे नशीब चमकले आहे. व्हायरल व्हिडिओमुळं त्यांना आत्तापर्यंत 500 ऑर्डर्स मिळाल्या आहेत.
Anand Mahindra Viral Post: भारतातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. ते अनेकदा भन्नाट व्हिडिओ शेअर करत असतात. तर, सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवरही मत मांडतात. त्याचबरोबर भारतातील काही जुगाडू लोकांनी केलेले प्रयोग व त्याचे व्हिडिओही बिनधास्त शेअर करत असतात. आनंद महिंद्रा यांच्या एका ट्विटने एका सर्वसामान्य माणसाचे नशीब मात्र फळफळले आहे. मुंबईत राहणाऱ्या सुभाजीत यांची आयडियाला चांगलीच चर्चेत आहे.
साधारण तीन महिन्यांपूर्वी मुंबईत राहणाऱ्या सुभाजीत मुखर्जी याने एसीतून निघणाऱ्या पाण्याचा पुर्नवापर करता यावा यासाठी एक नवीन टेक्निक शोधून काढली होती. या नवीन पद्धतीमुळं एसीतून निघणाऱ्या पाण्याचा बचत होऊन ते इतर कामांसाठी वापरता येऊ शकते. मुखर्जी यांनी शोधलेली ही नवीन पद्धत काहीजणांनी त्यांच्या घरी बसवली होती. मात्र, अपेक्षापेक्षा खूप कमी प्रतिसाद याला मिळत होता.
शनिवारी आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत एसीच्या पाण्याचा पुर्नवापर कसा करण्यात येत आहे. हे दाखवले आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शनदेखील लिहलं आहे. ही पद्धत देशभरात एसीसोबत लावायला हवी. पाणी अनमोल आणि ते सुरक्षित पद्धतीने जपायला पाहिजे. असं त्यांनी म्हटलं होतं. आनंद महिंद्रा यांच्या ट्विटनंतर सुभाजीत यांची आयडिया खूपच चालली आहे.
सुभाजीत यांनी म्हटलं आहे की, महिंद्रा यांच्या ट्विटनंतर त्यांना सतत फोन येत आहेत. 500हून जास्त ऑर्डर मला मिळाल्या आहेत. माझ्या डोक्यात एक आयडिया आली होती. जर एसीतून टपकणारे पाणी पाइपमध्ये जमा करुन ते नळाद्वारे जोडण्यात आले. पाइप भरल्यानंतर नळाद्वारे ते पाणी बादलीत काढून घेता येते. या पाण्याचा वापर लादी पुसण्यासाठी, घर साफ करण्यासाठी किंवा झाडांना पाणी देण्यासाठी करता येतो. यामुळं दररोज हजारो लाख लीटर पाण्याची बचत होते. या सिस्टमचा खर्च 1200 ते 1500 रुपयांपर्यंत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूपच सक्रीय आहेत. त्यांचे ट्विटरवर 1 कोटीहून अधिक फॉलोवर्स आहेत.
शाळेत फ्रीमध्ये लावण्याचा विचार
सुभाजीत ही सिस्टम शाळेत मोफत लावण्याचा विचार करत आहेत. जेणेकरुन शाळेतील विद्यार्थी यावरुन प्रेरित होऊन त्यांच्या घरातदेखील अशाप्रकारची सिस्टम लावण्याचा विचार करतील, सुभाजीत पुढे म्हणतात की, मला मुंबई व्यतिरिक्त अन्य शहरांतूनही ऑर्डर्स मिळाल्या आहेत. मला असं वाटतं की मी दुसऱ्यांनादेखील या पद्धतीबद्दल सांगू. जेणेकरुन ते स्वतःच ही पद्धत वापरु शकतील. मुखर्जी गेल्या कित्येक वर्षांपासून पर्यावरण संरक्षणासाठी काम करतात. महापालिकेच्या गार्डनमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगसह अनेक उपयुक्त झाडे त्यांनी लावली आहेत. तसंच, अनेक प्रकल्पही त्यांनी पूर्ण केले आहेत.