Ananya Sanman 2023 : ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना `झी 24 तास अनन्य जीवनगौरव` पुरस्कार प्रदान
Ananya Sanman 2023 : मुंबईत झी 24 तास अनन्य सन्मान सोहळ्या मोठ्या थाट्यामाट्यात पार पडला. शरद पवार यांच्या हस्ते यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवीवर्य, गीतकार नामदेव धोंडो अर्थात ना. धों. महानोर यांना देण्यात आला.
Ananya Sanman 2023 : अनन्य सन्मान 2023... झी 24 तास अनन्य सन्मान सोहळ्याचं हे चौदावं वर्ष... शिक्षण, कला, पर्यावरण, क्रीडा, कृषी, सामाजिक कार्य, शौर्य अशा विविध क्षेत्रात दिमाखदार कामगिरी करणाऱ्या गुणीजनांना दरवर्षी गौरविण्यात येतं. यंदा समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये अनन्य साधारण योगदान देणाऱ्या विभूतींचा झी 24 तास अनन्य सन्मान हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलं. यंदाचा अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्राचे रानकवी अशी ओळख असलेले ज्येष्ठ कवीवर्य, गीतकार ना. धों. महानोर यांना देऊन गौरवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (#sharadpawar) यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये रंगलेल्या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, न्या. सत्यरंजन धर्माधिकारी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्तेही विविध क्षेत्रात आपल्या अनन्यसाधारण कर्तृत्वानं महाराष्ट्राची शान वाढवणाऱ्या अलौकिक व्यक्तिमत्त्वांनाही झी 24 तास अनन्य सन्मानानं गौरवण्यात आलं.
ना. धों. महानोर यांनी झी 24 तासचे पुरस्कार दिल्याबद्दल आभार मानले. ते काय म्हणाले पाहा...
चंद्रकांत इलगयांचा सन्मान
चंद्रकांत इलग हे महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असलेले ख्यातनाम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक असून त्यांनी पोलीस दलात धनुर्विद्या खेळाची मुहूर्तमेढ रोवली.तब्बल ५० हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील आणि ३०० हून अधिक राज्य स्तरावरील धनुर्विद्या खेळाडू त्यांनी घडवले... शेकडो नवे अर्जून घडवणा-या या आधुनिक द्रोणाचार्यांना झी २४ तासचा सलाम...
रक्षिता आणि रोहित बनसोडे यांचा सत्कार
दुष्काळाचा कलंक सोसणारा साता-यातला माण तालुका... मात्र याच दुष्काळी तालुक्यातल्या गोंदवले खुर्द गावच्या माळरानावर चक्क वनराई फुललीय... याचं श्रेय जातं ते रक्षिता आणि रोहित बनसोडे या दोघा बहिण-भावंडांना... वयाच्या १२ व्या आणि चौदाव्या वर्षांपासून त्यांनी ओसाड, उजाड माळरानावर झाडं लावण्याचा वसा जपलाय. श्रमदानातून निसर्गाचं जतन आणि संवर्धन करणा-या या बनसोडे भावंडांच्या जिद्दीला आणि पर्यावरणप्रेमाला झी २४ तसाचा सलाम...
शिवाजी डोळे यांचा सन्मान
जय जवान, जय किसान... माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींना दिलेला हा नारा... तो शब्दशः जगण्याची किमया साधली ती मालेगावचे शिवाजी डोळे यांनी... लष्करातून निवृत्त झाल्यानंतर भारतमातेची सेवा करणाऱ्या माजी सैनिकांना एकत्र करून त्यांना भूमातेची सेवा करण्याचा मंत्र डोळे यांनी दिला... मालेगावात शेती महामंडळाच्या 400 एकर जागेवर त्यांनी नंदनवन फुलवलं. आधुनिक शेतीच्या माध्यमातून माजी सैनिकांना जगण्यासाठी उभारी देणाऱ्या या शेतकरी सैनिकाला झी २४ तासचा सलाम...
हेरवाड ग्रामपंचायतीचा सन्मान
पतीच्या निधनानंतर विवाहित महिलांवर कोसळतं ते वैधव्याचं दुःख... सौभाग्याचं लेणं असलेलं कुंकू पुसलं जातं, मंगळसूत्र काढून घेतात, हातातल्या बांगड्या फोडतात, पायातली जोडवी काढली जातात... हजारो वर्षांपासून चालत आलेली ही विधवा प्रथा... मात्र याच विधवा प्रथेला कायमची मूठमाती देण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली ती कोल्हापूरच्या हेरवाड ग्रामपंचायतीनं... विधवा प्रथा बंदीचा ठराव करून त्याची अमलबजावणी करणारी ही देशातली पहिलीच ग्रामपंचायत... छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीत सामाजिक सुधारणांचा नवा आदर्श उभा करणा-या हेरवाड ग्रामपंचायतीला झी २४ तासचा सलाम...
समता विचार प्रसारक संस्थेला पुरस्कार
महानगरांच्या मधोमध वसलेल्या बकाल वस्त्या... गरीबी आणि अत्यंत हलाखीचं असं या झोपडपट्ट्यांमधलं जगणं... या वस्त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या वेदना कुणी समजून घेतल्या? नेमकी हीच खंत दूर करण्यासाठी आकाराला आली ती नवी सांस्कृतिक चळवळ... स्लम थिएटर्स अर्थात वंचितांचा रंगमंच... वस्तीतलीच कलाकार मुलं-मुली त्यांचे रोजच्या जगण्यातले प्रश्न नाटकाच्या रुपानं जगासमोर मांडतात. ठाण्यातल्या समता विचार प्रसारक संस्थेच्या माध्यमातून हे रोपटं आता वाढू लागलंय... गेल्या 10 वर्षांपासून कुणाच्याही मदतीशिवाय ही सांस्कृतिक चळवळ सक्रीय ठेवणा-या कलावंतांना झी २४ तासचा सलाम...
अमित ऊर्फ आम्रपाली मोहिते यांचा सत्कार
तो बाप होऊ शकत नाही... तो आई देखील होऊ शकत नाही... म्हणूनच तो अनेक मुलांचा आईबाप झाला.... अमित ऊर्फ आम्रपाली मोहिते असं या तृतीयपंथीयाचं नाव... पुण्यातल्या फुटपाथवरच्या बेघर मुलांसाठी त्यानं सावली फूटपाथ शाळा सुरू केली. सध्या अशा सात शाळा पुण्यात सुरू आहेत. तब्बल ४० गरजू मुलांचं शैक्षणिक पालकत्व त्यानं स्वीकारलंय.. वंचितांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणा-या या समाजसेवकाला झी २४ तासचा सलाम...
आनंद देशपांडे यांचा सन्मान
आनंद देशपांडे... फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत झळकलेले भारतीय उद्योजक... तब्बल ५७ कोटी डॉलर्सचं वार्षिक उत्पन्न असलेल्या पर्सिस्टंट सिस्टीम कंपनीचे सर्वेसर्वा... आपल्यासारखेच नवे मराठी उद्योजक घडवण्याचा वसा त्यांनी हाती घेतलाय. त्यासाठी दे आसरा नावाच्या फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ते तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देतात. स्वतःच्या पैशातून पुणे पोलिसांसाठी 450 घरांचा प्रकल्प उभारून देशपांडे कुटुंबानं अनोखी सामाजिक बांधिलकी जपली... त्यांच्या या सेवाभावी कार्याला झी २४ तासचा सलाम...
सुप्रिया किंद्रे यांचा सन्मान
सुप्रिया किंद्रे... महाराष्ट्र पोलीस दलातील आणि देशातली पहिली, एकमेव महिला श्वान प्रशिक्षक... पुणे जिल्ह्यातील बालवडी गावातील सुप्रिया किंद्रे २००७ मध्ये पोलीस दलात भरती झाल्या. विविध विभागांमध्ये काम केलं. मात्र पोलीस श्वानांच्या कामाबद्दल त्यांना विशेष आत्मियता होती. २०२० मध्ये मध्य प्रदेशातल्या टेकनपूरमध्ये बीएसएफ राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण केंद्रात त्यांनी पुल ऑफ डॉग हँडलर कोर्स पूर्ण केला. आतापर्यंत त्यांनी १०० हून अधिक पोलीस श्वान आणि त्यांच्या ट्रेनर्सना प्रशिक्षण दिलंय. हे अनोखं शौर्य गाजवणाऱ्या सुप्रिया किंद्रेंना झी २४ तासचा सलाम...
कमलबाई शिंदे
कमलबाई शिंदे... महाराष्ट्राचं कुलदैवत, जेजुरीच्या खंडोबारायाची मुरळी... खंडोबाला मुरळी सोडण्याची ही प्रथा अन्यायकारकच... ती आता बंद झालीय. मात्र ती सुरू होती तेव्हा खंडोबाचं पत्नीत्व त्यांनी खुबीनं निभावलं. लहानपणीच खंडोबासोबत त्यांचं लग्न लागलं. आणि तेव्हापासून खंडोबाच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. मात्र आजही मुरळीच्या भूमिकेत जायला त्यांना वेळ लागत नाही. कारण त्यांच्यासाठी ती खंडोबा देवाची भक्ती आहे... अवघं जीवन कलेसाठी समर्पित करणाऱ्या या मुरळीला झी २४ तासचा सलाम...