Ramesh Latke Death | शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन (Ramesh Latke Death) झालं आहे.
मुंबई : राजकीय वर्तुळातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन (Ramesh Latke Death) झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार लटके हे सहपरिवार दुबईला होते. तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. लटके यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. लटके यांच्या निधनाचं वृत्त कळताच स्थानिकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली. (andheri east legaslative assembly constituency shiv sena mla ramesh latke passed away due to heart attack at age 52)
रमेश लटके यांच्याबाबत थोडक्यात
रमेश लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गटप्रमुख ते आमदार असा त्यांचा अफलातून राजकीय प्रवास होता. या प्रवासादरम्यान त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक ही आणि अशी विविध पदं यशस्वीरित्या भूषवली. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.
लटके यांनी 1997 ते 2012 अशा सलग 3 वेळा नगरसवेक पद भूषवलं. त्यानंतर 2014 मध्ये लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला.
आघाडीच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेल्या सुरेश शेट्टींना मतदारांनी 1999 ते 2009 अशा सलग 3 वेळा निवडून दिले होते. त्यामुळे सुरेश शेट्टींचा दबदबा होता. काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशी ही तिहेरी लढत होती.
भाजपकडून सुनील यादव मैदानात होते. तर काँग्रेसकडून सुरेश शेट्टी. मात्र जनतेने लटकेंना कौल दिला. लटकेंनी भाजपच्या सुनील यादव यांचा 5 हजार 479 मतांनी पराभव केला. तर काँग्रेसची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. यानंतर 2019 च्या लढतीत लटके यांनी अपक्ष मुरजी पटेल यांचा 16 हजार 965 इतक्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.