अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता लागू, 3 नोव्हेंबरला मतदान
Andheri East Vidhan Sabh by-election code of conduct applicable : निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदार संघातील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
मुंबई : Andheri East Vidhan Sabh by-election code of conduct applicable : शिवसेना फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आलेत. दोघांमधील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्याचवेळी शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात गेला. त्यानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण गोठवल्यानंतर आता नवीन चिन्हं घेऊन ठाकरे गट निवडणुकीसाठी सामोरे जात आहे. आता निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदार संघातील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. अंधेरीतून शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यात मुख्य लढत होणार आहे.
अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना उतविण्यात आले आहे. दरम्यान, ठाकरे गटाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता चूरस पाहायला मिळणार आहे.
मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार जाहीर केले आहे. 3 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाल्याचेही त्यांनी सांगितले. या निवडणुकीचा निकाल 6 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.
14ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करणे, 15ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी, 17 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख तसेच 3 नोव्हेंबरला मतदान, 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी आणि 8 नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. मतदारांची ओळख पटावी म्हणून नेमकी कोणती ओळखपत्रे लागतील, त्याची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.