राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, नाराज डॉ. भारती भाजपमध्ये?
माजी खासदार रणजितसिंह मोहीते पाटील यांनी आपल्या पदांचा राजीनामा देत भाजपच्या गोठात दाखल होत आहेत. हा धक्का कमी की काय आता दुसरा धक्का राष्ट्रवादीला डॉ. भारती पवार यांनी दिला आहे.
मुंबई : माढामधील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार रणजितसिंह मोहीते पाटील यांनी आपल्या पदांचा राजीनामा देत भाजपच्या गोठात दाखल होत आहेत. हा धक्का कमी की काय आता दुसरा धक्का राष्ट्रवादीला डॉ. भारती पवार यांनी दिला आहे. त्याही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती हाती आली आहे. दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादीने धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर केल्याने भारती पवार या नाराज झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. भारती पवार यांनी मागील लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिंडोरी मतदारसंघातून लढवली होती.
- राष्ट्रवादीला नाराजीचा फटका, भाजपला उमेदवारांचे अच्छे दिन
- राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार भाजपमध्ये प्रवेश करणार
- भारती पवार यांनी मागील लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिंडोरी मतदारसंघातून लढवली होती
- यावेळी दिंडोरीची उमेदवारी न मिळाल्याने भारती पवार भाजपमध्ये प्रवेश करणार
- राष्ट्रवादीने धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर केली आहे
- भारती पवार यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता
- भाजपाचे दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी भारती पवार यांना उमेदवारी
मोहिते पाटील यांचा मेळावा
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिंरंजीव रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी भाजपा प्रवेशाची घोषणा केली आहे. अकलूजमध्ये बोलावलेल्या समर्थांकाच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे या मेळाव्याला विजयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित होते. त्यांनीही मेळाव्याच्या समारोपाच्या भाषणात आपण समर्थकांच्या भूमिकेशी सहमत असल्याचे सांगत भाजप प्रवेशाचे संकेत दिले. उद्या दुपारी १२.३० वाजता वानखेडे स्टेडिअमच्या गरवारे हॉलमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडणार असून मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष उपस्थित असणार आहेत.