`ज्याने मराठीबाईचं कुंकू पुसलं त्याला वाचवण्याचा प्रयत्न`
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचं वक्तव्य
मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या हे रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. शिवाय एका मराठी बाईचं कुंकू ज्याने पुसलं, अशा माणसाला वाचवण्याचा प्रयत्न दिल्लीपासूनचे सर्व नेते करत असल्याचं परब यांनी म्हटलं आहे.
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली होती. अखेर अर्णब गोस्वामी यांना ८ दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे.
काय म्हणाले अनिल परब?
किरीट सोमय्या हे अर्णब गोस्वामी यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ ते एखाद्या हत्याऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका मराठीबाईचं कुंकू ज्याने पुसलं, अशा माणसाला वाचवण्याचा प्रयत्न दिल्लीपासूनचे सर्व नेते करत आहेत. असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक आणि आई कुमुद नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन इसमांनी नाईक यांचे ५.४० कोटी रुपये थकवल्याचा आरोप करत त्यांनी गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरले होतं. या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.