मुंबई: कोहिनूर स्क्वेअर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे गुरुवारी अंमलबजावणी संचलनलायच्या (ईडी) चौकशीला सामोरे गेले. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे आणि सून मिताली ठाकरे असा सर्व लवाजमाही 'ईडी'च्या कार्यालयाकडे रवाना झाला. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांना उपरोधिक टोला हाणला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा drama? का सहनुभी गोळा करण्याचा हा प्रयत्न, असा सवाल अंजली दमानिया यांनी ट्विट करून विचारला. 


राज ठाकरे यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयापर्यंत गेले असले तरी ते आतमध्ये गेलेले नाहीत. हे सर्वजण जवळच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. राज यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत हे सर्वजण याचठिकाणी थांबतील. मात्र, आता 'ईडी'चे अधिकारी किती तास राज यांची चौकशी करणार, याकडेही अनेकांचे लक्ष आहे. 



दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी मात्र राज ठाकरे यांचे समर्थन केले आहे. ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबावतंत्र आहे. जो कोणी आवाज उचलतो त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सरकार करते. अशावेळी कुटुंबीयच मागे उभे राहतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी ईडीच्या कार्यालयापर्यंत सहकुटुंब जाण्याबद्दल कोणीही टीका करु नये, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.



राज ठाकरे यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबई आणि ठाण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यामध्ये मरीन ड्राईव्ह, एमआरए मार्ग पोलीस, आझाद मैदान, दादर पोलीस स्टेशन या भागांचा समावेश आहे.