अश्विनी बिंद्रे हत्याप्रकरणात आलं निनावी पत्र
अश्विनी बिंद्रे यांच्या वडिलांना आलं निनावी पत्र
मुंबई : महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्येसाठी कोल्हापूरातून शस्त्र पुरवल्याचा दावा एका निनावी पत्रातून करण्यात आला आहे. अश्विनी बिंद्रे यांच्या वडिलांना निनावी पत्र आलं आहे. कोल्हापूरातील बुधवार पेठेतील तरुणाने हत्येचा आरोप असलेला निलंबित पोलीस निरीक्षक कुरुंदकर याला कटर पुरविल्याचा पत्रात उल्लेख आहे. अश्विनी बिद्रे यांच्या वडिलांनी पोलिसांना पत्र देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांची हत्या झाल्याचे काही महिन्यांपूर्वी उघड झाले होते. अभय कुरुंदकर याचा बालपणीचा मित्र महेश फळशीकर याने अश्विनी यांच्या हत्येची कबुली दिली. अश्विनी यांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आणि हे तुकडे वसईच्या खाडीत फेकून देण्यात आल्याचे फळशीकरने कबुली दिली होती.
काय आहे प्रकरण
कोल्हापूर जिल्ह्यातील आळते येथील अश्विनी जयकुमार बिंद्रे यांचा विवाह २००५ साली हातकणंगलेतील सामाजिक कार्यकर्ते राजू गोरे यांच्याशी झाला. लग्न झाल्यानंतर एक वर्षानंतर अश्विनी पोलीस उपनिरीक्षक झाल्या. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली.
याच दरम्यान त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. काही कालावधीनंतर कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरांनी अश्विनी यांच्या पतीला गायब करण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. या काळातच २०१५ साली अश्विनी यांची बदली कळंबोली पोलीस ठाण्यात झाली. त्या हजर झाल्या नाहीत. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ अधिकारी अभय कुरुंदकर यांनी त्यांना बेपत्ता केल्याचा आरोप त्यांचे पती आणि भावानं केल्यानंतर कुरुंदकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.