Maharashra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. याच कारण म्हणजे गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणत प्रचंड वेगवान घडामोडी घडत आहेत. आता चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत ओबीसी नेते छगन भूजबळ (Chhagan Bhujbal). राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. अचानक घेतलेल्या या भेटीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.  या भेटीबाबत राजकीय चर्चा सुरू असतानाच ही भेट आरक्षणाबाबत असल्याचं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलंय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुजबळांनी पवारांची घेतलेली भेट खरंच फक्त आरक्षणासाठी होती का? या भेटीमागे काही राजकीय भुकंपाचा केंद्रबिंदू दडलाय का? असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतायत. लोकसभा आणि राज्यसभेला इच्छुक असूनही संधी न मिळाल्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच अलिकडच्या काळात छगन भुजबळांनी महायुतीच्या विरोधात घेतलेल्या भूमिकांमुळे भुजबळांच्या मनात वेगळा विचार सुरू असल्याचीही शक्यता वर्तवली जातेय. भुजबळांच्या नाराजीमागे काय कारणं आहेत त्यावर नजर टाकुया... 


छगन भुजबळांच्या मनात काय? 
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नाव सुचवूनही छगन भुजबळ यांना लोकसभेला उमेदवारी देण्यात आली नाही.  राज्यसभेला इच्छुक असताना भुजबळांऐवजी सुनेत्रा पवारांना संधी देण्यात आली. त्यामुळे नाराज असलेले भुजबळ शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर ठाकरेंवर टीका करणं त्यांनी टाळलं. इतकंच नाही तर बाबासाहेबांच्या फोटो अवमान प्रकरणी त्यांनी जितेंद्र आव्हाडांना पाठिंबा दिला. याच प्रकरणात स्वपक्षीय मंत्री हसन मुश्रीफांवर त्यांनी टीका केली. कांदा प्रश्नावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. आता शरद पवारांच्या भेटीमुळे पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. 


मोठ्या पवारांची भेट घेतल्यानंतर भुजबळांनी काही वेळातच अजित पवारांचीही भेट घेतलीय. त्यामुळे छगन भुजबळ अजित पवारांचा काही निरोप घेऊन गेले होते का अशाही चर्चा सुरू झालेत. दरम्यान, सुप्रिया सुळेंनीही भुजबळांची महायुतीमध्ये हेळसांड होत असल्याचं सूचक वक्तव्य केलंय. महायुतीला डॅमेज होईल असा निर्णय भुजबळ घेणार नाहीत, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलाय. तर पवारांवर केलेल्या टीकेचा खुलासा करण्यासाठी त्यांनी भेट घेतली असावी, असा दावा अंबादास दानवेंनी केलाय...


महायुतीमध्ये छगन भुजबळ नाराज आहेत का? आगामी काळात भुजबळ राज्यात आणखी एक राजकीय भुकंप करणार का? अशा चर्चा सुरू झालेत. गेल्या पाच वर्षांतील राज्याचं राजकारण पाहाता असं काही झालंच तर आश्चर्य वाटायचं कारण नाही.