शिवसेनेच्या आणखी एका घोटाळ्याची पोलखोल करणार! भाजपने दिला इशारा
मुंबईकरांसमोर घोटाळ्याची पोलखोल करण्याचा इशारा भाजपने दिला आहे
मुंबई : भाजप (BJP) आणि शिवसेनेतल्या (Shiv Sena) वादाने राजकीय वातावरण तापलं असतानाच आता भाजपने शिवसेनेवर आणखी एका घोटाळ्याचा आरोप केला आहे. बेस्टच्या (BEST) 900 ई बसेसच्या 3600 कोटींच्या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप आमदार मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) यांनी केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Election 2022) तोंडावर भाजप आता चांगलीच आक्रमक झाली आहे.
900 इ बसेस (Electric Bus) विद्युत गतीने खरेदी करण्याचा डाव हा मुंबईकरांसाठी आहे की कॅासेस मोबेलिटी या कंपनीच्या भल्यासाठी? असा प्रश्न मिहिर कोटेचा यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय शुद्ध हवा वायू अभियानासाठी 3600 कोटीचा निधी मुंबईकरांना शुद्ध हवा मिळावी यासाठी दिला पण त्याच्यावर डल्ला विशिष्ट ठेकेदाराच्या भल्यासाठी मारला जातोय असा आरोप आमदार कोटेचा यांनी केला आहे.
निविदा 200 इ बसेसची गाड्यांची निघते ती नंतर 400 केली जाते आणि मंजूरी मिळेपर्यंत कुठलीही पुनर्निविदा न काढता ती 900 होते.
आपण कधी जमीनीवर उतरून पाहणी केली आहे का? की 900 दुमजली बसेस मुंबईच्या रस्त्यावर खरोखर त्या धावू शकतील का? याचा कधी फिजीबीलीटी रिपोर्ट घेतलाय का? किंबहूना ही खरेदी फक्त कागदावरतीच करायचा हेतू नाहीये ना? असे सवाल कोटेचा यांनी उपस्थित केले आहेत.
या कंपनीचं भाग भांडवल फक्त एक लाख रूपये आहे त्यांना तुम्ही 2800 कोटीचं कंत्राट कोणत्या आधारावर व कोणत्या हेतूसाठी देत आहात?
याची आम्ही मुंबईकरांसमोर पोलखोल करणार तसंच 2800 कोटींच्या घोटाळ्याबाबत आम्ही कॅग आणि न्यायालयात दाद मागणार असल्याचं आमदार मिहिर कोटेचा यांनी म्हटलं आहे. आम्ही मुंबईकरांचा मोकळ्या शुद्ध हवेत श्वास घेण्याचा हक्क तुमच्या घोटाळ्याने हिरावू देणार नाही, असंही आमदार कोटेचा यांनी म्हटलं आहे.