महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ बंद
नवी मुंबईतील शाळा आणि कॉलेज, मुख्य बाजारपेठ बंद
नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमधून नवी मुंबई मधील संघटनांनी माघार घेतली असली तरी आज नवी मुंबई मधील सर्व शाळा आणि कॉलेज तसेच शहरातील मुख्य बाजारपेठ बंद आहेत. त्याचबरोबर मुंबई आणि उपनगरांना भाजीपाला पुरवठा करणारे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे, भाजीपाला, फळ आणि कांदा बटाटा मार्केट देखील आज व्यापाऱ्यांनी बंद ठेवले आहे. शेतकऱ्याच्या मालाचे नुकसान होऊ नये यासाठी भीतीपोटी आज मार्केट बंद ठेवण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमधून काही शहरांनी माघार घेतली आहे. मुंबई, नवी मुंबईतील मराठा समन्वय समितीने बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही शहरात केवळ काळ्या फिती लावून आंदोलन केलं जाणार आहे.
मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे. मात्र एसटी महामंडळाने मुंबईतले तीनही एसटी डेपो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.