लहान मुद्दे उपस्थित करणाऱ्यांच्या ज्ञानाचे कौतुक
टीकाकारांना शरद पवारांचे चोख उत्तर
मुंबई : एसटी कामगारांच्या २२ संघटनांच्या प्रतिनिधींनी काल शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर रुजू व्हावं असं आवाहन एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी केलं. मात्र, या बैठकीबाबत भाजप प्रवक्ते राम कदम यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार शरद पवार यांना दिला आहे का? मुख्यमंत्री आणि प्रशासनातील अधिकारी नसताना शरद पवार अशी बैठक कशी काय घेऊ शकतात, असे सवाल राम कदम यांनी उपस्थित केले होते.
राम कदम यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी कदमांची खिल्ली उडविली आहे. एखाद्या कर्मचारी संघटनेने मला चर्चेला बोलवले तर लोकशाहीत चर्चा करू शकत नाही का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे.
कर्मचारी संघटना चर्चा करू इच्छितात त्यात सहभागी होणे गरजेचे वाटते. विरोधक असे लहान लहान मुद्दे उपस्थित करताहेत याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या अगाध ज्ञानाचे कौतुक करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
लोकांनी मला बोलवले तेव्हा परिवहन मंत्र्यांना विचारले असता त्यांनीही दोघांनी यासाठी जायला हवं, असे म्हटले. राज्याच्या दृष्टीने आवश्यक आलेले निर्णय हे मुख्यमंत्रीच घेतात. महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ घेत असते. त्यामुळे सरकार पातळीवर याबाबत काय चाललंय हे मला माहित नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं.
गोव्यात काँग्रेससोबत एकत्रित जाण्यासंदर्भात चर्चा झाली. पण ती अजून सुरू आहे. काँग्रेसची भूमिका काय आहे हे मला माहित नाही, कारण आमच्या पक्षाकडून प्रफुल पटेल चर्चा करतायत. गोव्यात भाजपचे सरकार हटवण्याची गरज आहे. त्यासाठीही चर्चा झाली पाहिजे.
केंद्रीय माजी मंत्री मौर्य यांनी सुरुवात केली आहे, ती थांबणार नाही. अनेक लोक भाजप सोडून येतील. तसेच, पंजाबच्या घटनेबद्दल भाष्य करण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने याची चौकशी करण्याचे ठरवले असून स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. पंतप्रधानांची सुरक्षा हा विषय महत्त्वाचा आहे. केंद्र असो वा राज्य सुरक्षेची जबाबदारी सगळ्यांची आहे. याचे राजकारण करणे योग्य वाटत नाही असे पवार म्हणाले.
काँग्रेस उत्तर प्रदेशात वेगळं लढतंय त्याचा फटका बसेल असं वाटत नाही, पंजाबची स्थिती काँग्रेससाठी अनुकूल होती. मात्र, तिथे काही बदल झाले आहेत त्यावरून तिथे काय होईल हे सध्या सांगता येत नाही. तिथे काँग्रेसला फायदा होईल की आप पक्षाला ते सांगता येत नाही, असे त्यांनी सांगितले.