नास्तिक असून धार्मिक कार्यक्रमात कसे? जावेद अख्तर म्हणाले, राज ठाकरेंनी त्यांच्या शत्रूंना...
Javed Akhtar : कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी गुरुवारी सांगितले की, भगवान राम आणि सीता हे केवळ हिंदू देव-देवता नाहीत तर त्यांना भारताचा सांस्कृतिक वारसा म्हणता येईल.
Mumbai News : मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आयोजित केलेल्या दीपोत्सवाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. या दीपोत्सवाला प्रसिद्ध पटकथा लेखक जावेद अख्तर, सलीम आणि आशुतोष गोवारीकर यांच्यासह मराठीतील अनेक कलाकार हजेरी लावली होते. अभिनेता रितेश देशमुख याने यावेळी जावेद अख्तर आणि सलीम खान यांची मुलाखत घेतली. यावेळी जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी हिंदूच्या (Hindu) सहिष्णुतेचं कौतुक केले आहे.
"मी अनेकवेळा सांगितले आहे तरी तुम्हाला पुन्हा सांगतो. जर आम्ही आज शोले चित्रपट लिहीत असतो तर अभिनेत्री मंदिरात जाते आणि देवामागे धर्मेंद्र उभा असतो हा सीन लिहिलाच नसता. त्याच्यावरुन वाद झाला असता. ओम प्रकाशनं संजोगमध्ये कृष्ण सुदामाची गोष्ट गाण्यातून ऐकवली होती. आज ऐकवून दाखवा. समाजात असहिष्णुता वाढली आहे. सहनशीलता कमी झालीये हे चांगलं नाहीये. हिंदू असे नव्हते. हिंदुचे वैशिष्टे आहे की त्यांच्या हृदयात मोठेपणा राहिला आहे. हे जर संपलं तर तुम्हीसुद्धा इतरांसारखे व्हाल हे लक्षात ठेवा. तुमच्या जगण्याची पद्धत आम्ही शिकलो आहोत आणि तुम्हीच सोडून देणार काय? हे चालणार नाही. हिंदुस्तानात लोकशाही आता तरी आहे पुढचे बघुयात. इथे आपण हजारो वर्षांपासून या गोष्टीपासून सहमत आहोत की लोक वेगवेगळे विचार करु शकतात. मूर्ती पूजा केली तर हिंदू, मूर्ती पूजा नाही केली तरी हिंदू, एका ईश्वराला मानत असाल तर हिंदू आहात, 32 कोटींना मानलत तर हिंदू आहात, कोणालाही मानत नसाल तरी हिंदू आहात. ही हिंदू संस्कृती आहे. यानेच आपल्याला लोकशाही शिकवली आहे. यामुळे या देशात लोकशाही आहे. मी बरोबर आणि बाकीचे चुकीचे असा विचार करणे हे हिंदूचे काम नाही. तुम्हाला जो हे शिकवेल तो चुकीचा आहे," असे जावेद अख्तर म्हणाले.
"आम्हाला मानसन्मान दिला त्याबद्दल राज ठाकरेंचं आभार मानलं पाहिजे. काही गोष्टी स्पष्ट बोलल्या पाहिजेत. उघड बोललं पाहिजे. तेव्हाच मजा येते. या मंचावर आम्हाला पाहून काही लोकांना आश्चर्य वाटलं असेल. राज ठाकरेंना सलीम-जावेदच्या शिवाय दुसरं कोणी मिळालं नाही का? असं अनेकांना वाटेल. स्वत:ला नास्तिक समजणारे जावेद अख्तर या मंचावर कसे असंही अनेकांना वाटलं असेल. कारण हा धार्मिक उत्सव आहे. पण त्याला दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे ते आमचे चांगले मित्र आहेत. आणि दुसरं म्हणजे राज ठाकरेंनी आपल्या शत्रूंना तरी आमंत्रण दिलं तर कोणी नकार तर नाही देणार," असंही जावेद अख्तर म्हणाले.