डोंबिवली : डोंबिवलीतल्या भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून प्रचंड शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धनंजय कुलकर्णी (49) असे या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव असून तो डोंबिवली शहर उपाध्यक्ष आहे. धनंजयच्या दुकानातून एअरगन, फायटर्स, बटनचाकू, चॉपर, तलवारी, कुकरी, गुप्त्या अशी तब्बल १७० शस्त्र जप्त करण्यात आली. ही शस्त्र विक्रीसाठी आणली होती की इतर कारणासाठी याबाबत पोलीस तपास सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर याप्रकरणामुळे भाजपची कोंडी होणार असून तिथून अद्याप कोणतीही प्रतिक्रीया आली नाही. दरम्यान या कार्यवाहीत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहीती समोर येत आहे. तसेच कारवाई थांबवावी यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात असल्याची माहितीही समोर येत आहे.


2 लाखांची शस्त्र ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवलीत धनंजय कुलकर्णीचे फॅशनेबल वस्तूंचे दुकान आहे. मात्र इथून शस्त्रास्त्रांची विक्री होत असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार त्यांनी आज त्याच्या दुकानात धाड टाकली. त्यानंतर हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या शस्त्रसाठ्याची किंमत साधारण 2 लाख इतकी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.


चौकशी सुरू    


डोंबिवलीतील महावीरनगर भागात अरिहंत इमारतीच्या तळमजल्यावर तपस्या फॅशन हाऊस हे दुकान धनंजय कुलकर्णीच्या मालकीचे आहे. अनेक विदेशी पिस्तुलांसह, चाकू, कुऱ्हाडी यांच्यासहित सुरे, तलवारींचाही समावेश आहे. धनंजय इतक्या मोठ्या शस्त्रसाठ्याचे काय करणार होता ? त्याला हा साठा कोणी पुरवला ? या शस्त्रांची विक्री केली जाणार होती का ? काही घातपाताचा प्रयत्न होणार होता का ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.