नवी मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अर्णब यांनी अलिबाग मधील एका पालिकेच्या शाळेत उभारण्यात आलेल्या  क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र क्वारंटाईन सेंटरमध्ये ते फोनचा वापर करत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, त्यांच्याकडे फोन आला कुठून, त्यांना फोन कोणी दिला? याची चौकशी केली जात आहे. ताब्यात घेतल्यानंतर अर्णब यांच्याकडून फोनचा वापर होत असल्याचं कळताच त्यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. ते सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे रायगड पोलिसांकडून सांगण्यात आले.


इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावली. सध्या ते तळोजा कारागृहात आहेत. 


काय आहे प्रकरण 
५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक आणि आई कुमुद नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन इसमांनी नाईक यांचे ५.४० कोटी रुपये थकवल्याचा आरोप करत त्यांनी गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरले होतं. या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.