मुंबई : अंगणवाडी सेविकांसंदर्भात एक चांगली बातमी.अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणाऱ्या विम्याच्या रक्कमेचा धनादेश तात्काळ निवृत्तीच्या दिवशीच त्यांना देता येईल, अशी प्रक्रिया राबवावी तसेच सध्या प्रलंबित असलेली विमा प्रकरणे महिनाभरात निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना विम्याची रक्कम निवृत्तीच्या दिवशी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर १ लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात येते. मात्र, ही रक्कमदेखील सेवानिवृत्तीनंतर लगेच न मिळता बऱ्याच विलंबाने मिळत असल्याच्या तक्रारी मंत्री ॲड. ठाकूर यांच्यापर्यंत आल्या होत्या. त्यांनी याची तात्काळ दखल घेत बुधवारी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) अधिकाऱ्यांना या संदर्भात मार्ग काढण्याचा आदेश दिला आहे. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त  इंद्रा मालो उपस्थित होत्या.



सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची एलआयसी विम्याची प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्याबाबत त्यांच्या कानावर माहिती घालण्यात आली होती. त्यानंतर ॲड. ठाकूर यांनी विमा प्रक्रियेबाबतही माहिती जाणून घेतली.  विम्याच्या दाव्यांवर सेवानिवृत्तीनंतर प्रक्रिया सुरु करण्यात येत असल्यामुळे विलंब होत असल्याचे लक्षात घेऊन विम्याचे पैसे सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळण्याकरिता निवृत्तीपूर्वी दोन महिने आधी विमा रक्कम देण्याबाबतची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.


दरम्यान, अंगणवाडी सेविका, मदतनीस या लहान बालकांचे पोषण, गरोदर महिला, स्तनदा मातांचे पोषण, आरोग्य यासाठी समर्पण भावनेने काम करत असताना त्यांचेच देणे दीर्घकाळ प्रलंबित राहणे चांगली गोष्ट नाही. त्यामुळे सध्या असलेली सर्व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढून त्यांना दिलासा द्या; प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याकरिता स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावेत, असे निर्देशही ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिले.