मुंबई : मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या बॉलीवूड अभिनेता शाहरुख (Shah Rukh Khan)खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) समोरच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीएत. वकिलांच्या दीर्घ युक्तीवादानंतरही न्यायालयाकडून आर्यनला दिलासा मिळू शकलेला नाही. आज मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी राखून ठेवली आहे. (No Relief for Aryan Khan, Bail Order on Oct 20)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यनच्या जामीन अर्जावरची सुनावणी आता 20 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे आणखी पाच दिवस आर्यनला जेलमध्येच काढावेत लागणार आहेत. आर्यनबरोबरच सर्व आरोपींना 20 तारखेपर्यंत आर्थर रोड जेलमध्येच (Arthur Road jail) रहावं लागणार आहे. 


आर्यनच्या वकिलांचा युक्तीवाद


न्यायालयात आर्यन खानच्या बाजूने अॅड अमित देसाई (Lawyer Amit Desai) यांनी युक्तीवाद केला. केवळ षड्यंत्राची शक्यता असल्याचं सांगून आर्यनच्या जामिनाला विरोध करता येणार नाही. आर्यनच्या फोनमध्ये कोणत्याही रेव्ह पार्टीचा उल्लेख नाही, असं अमित देसाई म्हणाले. अमित देसाई यांनी न्यायालयात युक्तीवाद केला की अनेक वर्षे परदेशात होता. तिथे अनेक गोष्टी कायदेशीर होत्या. 


आर्यन खानचे वकील अमित देसाई म्हणाले, ASG ने 24 ऑगस्ट 2021 चा निकाल वाचला नाही, ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींचे तरुण वय लक्षात घेता त्यांना सुधारण्याची एक संधी दिली पाहिजे असं म्हटलं आहे. जर त्याची पुनरावृत्ती झाली तर कारवाई झाली पाहिजे. वय लक्षात घेता न्यायालयाने दिलासा दिला होता.


एनसीबीच्या वकिलांचा युक्तीवाद


यावर एनसीबीकडून (NCB) युक्तीवाद करण्यात आला. एनसीबीने म्हटलं की त्यांच्याकडे असे अनेक पुरावे आहेत जे दर्शवतात की आर्यन गेल्या अनेक वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. एवढंच नाही तर दुसऱ्या देशांमध्ये देखील आर्यन ड्रग्सचं सेवन करत असल्याचं उघड झालं आहे. एनसीबीने आर्यन खानच्या जामिनाला विरोध केला. यावर आर्यनचे वकील अमित देसाई यांनी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीच्या प्रकरणाचा संदर्भ दिला. शौविक प्रकरणात आरोपपत्र सादर केल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. म्हणून आर्यन खानलाही या प्रकरणात जामीन मिळायला हवा.


आर्यनच्या वकीलांनी कोर्टात त्याच्या खाजगी चॅटचा संदर्भ देत सांगितलं की, आजकाल लोक सिनेमात ड्रग्जबद्दल बोलतात, ड्रग्सवर पुस्तक लिहिली जातात. याचा अर्थ असा नाही की हे सर्व ड्रग्ज तस्करीशी संबंधित आहेत.


2 ऑक्टोबरला झाली होती अटक


ड्रग्स प्रकरणात 2 ऑक्टबरला आर्यन खानला अटक करण्यात आली होती. 3 ऑक्टोबरला किला कोर्टाने एक दिवासाचा रिमांड मंजूर केला. 4 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत आर्यनला 7 ऑक्टोबरपर्यंत एनीसीबी कोठडी सुनावण्यात आी. एनसीबी कोठडी संपल्यानंतर आर्यन खानसह इतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आजही आर्यन खानला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे आणखी पाच दिवस आर्यनला तुरुंगातच राहवं लागणार आहे. आर्यन खानबरोबरच अरबाझ मर्चंट आणि मूनमून धमेचा यांच्या जामीन अर्जावरही 20 तारखेलाच सुनावणी होणार आहे.