कहर सुरूच आज आढळले मुंबईत तब्बल ८,०६३ नवे रुग्ण
धारावी, दादर व माहीम ठरले पुन्हा हाॅटस्पाॅट
मुंबई : गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या कोरोना बाधितांची संख्या काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज रविवारी फक्त मुंबईत ८,०६३ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याने मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे.
राज्यात आज दिवसभरात नवीन कोरोना बाधितांची संख्या ११ हजार ८७७ वर पोहोचली आहे. तर एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, राज्यात आज ओमायक्रॉनचे नवीन ५० रुग्ण सापडले असून यात पुणे मनपा विभागात सर्वाधिक ३६ रुग्ण, पिंपरी चिंचवड - ८, पुणे ग्रामीण - २, सांगली - २, ठाणे - १ आणि मुंबई - १ यांचा समावेश आहे.
दरम्यान, मुंबईत आज दिवसभरात ५७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी कोरोनामुळे मृत्यू होण्याची शून्य नोंद झाल्याने मृतांची संख्या १६,३७७ वर स्थिरावली आहे. तर, आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू होण्याची नोंद ८ व्यांदा शून्य झाल्याने ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळवलेल्या धारावी, दादर व माहीम पुन्हा एकदा कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाले आहे. या तिन्ही ठिकाणी रविवारी २७४ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने जी उत्तर विभागातील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब ठरली आहे.