मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढत असताना सरकारवर टीकेची एकही संधी विरोधी पक्षाकडून सोडली जात नाहीये. राज्यात कोरोनाच्या थैमानाचं खापर राज्य सरकाच्या कारभारवर फोडण्यात येत आहे. आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करीत ट्विट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विट करीत शेलार यांनी म्हटले आहे की, 'एक वर्षापूर्वी जेव्हा कोरोना विषाणूचा कोणताही इतिहास, भूगोल माहीत नव्हता.. आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नव्हती, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेव पर्याय म्हणून जन सहभागातून लॉकडाऊन घोषित केला, त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.' 


'आज एक वर्षानंतर कोरोनाचे उपचार, लस, आरोग्य यंत्रणा असे बरेच काही उपलब्ध आहे. तेव्हा महाराष्ट्रातील तेच "हुषार" सत्ताधारी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे सांगतात'. असे शेलार यांनी म्हटले आहे.


'आम्ही तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत नाही, किंवा लॉकडाऊनला विरोध ही करीत नाही,कारण जनतेचा जीव महत्वाचा! मजूर तेव्हा स्थलांतरित होताना केंद्र सरकारने रस्तोरस्ती, घरोघरी मदत पोहचवली, धान्य, निवारा दिला!
आज घरी जाणाऱ्या मजूरांना कुठलीही मदत दिली जात नाहीये. ना पाणी ना धान्य फक्त रेल्वे स्टेशनवर लाठ्याकाठ्यांचा मार दिला जातोय. अशी संतप्त भावना शेलार यांनी बोलून दाखवली.


'तेव्हा मा.मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत, मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना? असा सवालही त्यांनी महाविकास आघाडीला विचारला.