आरजे मलिष्काच्या मदतीला धावले आशिष शेलार-नितेश राणे
मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय काय म्हणणाऱ्या आरजे मलिष्काच्या घराची बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे.
मुंबई : मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय काय म्हणणाऱ्या आरजे मलिष्काच्या घराची बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. बांद्रा पश्चिम, पालीनाका येथील सनराईज बिल्डींगमधील मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
पण बीएमसीनं ही कारवाई सूडबुद्धीनं केल्याचा आरोप होत आहे. मलिष्कानं धाडसानं मुंबईकरांच्या समस्या गाण्यातून मांडल्या. तिच्या घरी महापालिका कर्मचा-यांनी जाणं आणि डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचं सांगणं योग्य नाही. महापालिका आयुक्तांनी यात लक्ष घालावं, असं ट्वीट मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी केलंय.
आशिष शेलार यांच्याबरोबरच काँग्रेस आमदार नितेश राणेही मलिष्काच्या मदतीला धावलेत. मलिष्का तू एकटी नाहीस. आम्ही आहोत तुझ्याबरोबर... वाघोबा करतो म्याव म्याव, आम्ही आणि मलिष्का बहिण भाव... अशी ट्वीटोळी नितेश राणेंनी केली आहे.