आरे मेट्रो कारडेपोच्या प्रश्नावर अश्विनी भिडे यांची रोखठोक उत्तरं
मुंबई मेट्रोच्या आरे कारडेपोला विरोध होत आहे. हा विरोध जनहितार्थ कसा नाही, किंवा समाजमाध्यमांवर असे निर्णय घेणं कसं योग्य नाही.
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई मेट्रोच्या आरे कारडेपोला विरोध होत आहे. हा विरोध जनहितार्थ कसा नाही, किंवा समाजमाध्यमांवर असे निर्णय घेणं कसं योग्य नाही. यावर एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी रोखठोक उत्तरं दिली आहेत.
मुंबई मेट्रो ३ चं काम ४८ टक्के पूर्ण झालं असताना हा विरोध होत आहे. हा विरोध जनहितार्थ नाही. कारण आरे कारडेपो झाला नाही, तर मेट्रो ३ ही त्याशिवाय कार्यान्वित होवू शकत नाही. आरेमध्येच कारशेड का तर ती तांत्रिक गरज आहे. कांजूरमार्गमध्ये जागा आहे, पर्याय आहे तरी कांजूरमार्गला कारशेड केलं जात नाहीत, हे वस्तुस्थितीला धरून नाहीत.
कारण आरेमधील मेट्रो कारडेपो इतरत्र स्थलांतरीत करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य नाही. कारण काम ४८ टक्के पूर्ण झालं आहे. कांजूरमार्ग हा पर्याय नसल्याचं तांत्रिक समितीने यापूर्वीच २०१५ मध्ये म्हटलं आहे. तसेच मेट्रो जिथे संपते, त्या बाजूला कारशेड असावं, त्या जागी आरे आहे, आणि त्याच्या विरूद्ध टोकाला समुद्र आहे, समुद्रात आपण कारडेपो बनवू शकत नसल्याचंही यावेळी अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केलं आहे.
२०११ मध्ये मेट्रोसाठी हे सर्वेक्षण झालं होतं, पण २०१५ मध्ये जी समिती नेमली होती, त्यांनी देखील अहवाल दिला होता की, कांजूरमार्गची जागा त्यासाठी योग्य नाही. पण काही लोकांच्या फायद्यासाठी आरेडेपो इतरत्र करणे परवडणारं नाही आणि ते तांत्रिक दृष्ट्या शक्य नसल्याचंही अश्विनी भिडे यांनी रोखठोक सांगितलं आहे.