मुंबई : साधारण 10 जागांच्या वाटाघाटीवर एकमत होत नसल्याने युतीचं जागावाटपाचं घोडं पुन्हा अडलं आहे. त्यामुळे आज शिवसेना भाजपची संयुक्त पत्रकार परिषद होत युतीची घोषणा होण्याची शक्यता मावळली आहे. शिवसेना 115 -125  आणि भाजप 173 - 163 अशा आकडेवारी दरम्यान एकमत होण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडून काल रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र पुन्हा एकदा दोन्ही पक्षांनी ताठर भूमिका कायम ठेवल्याने जागावाटपाला अंतिम स्वरूप देणे अशक्य झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेली जागावाटपाची बोलणी अगदी शेवटच्या क्षणी पुन्हा रखडली आहेत. अर्थात नेमक्या कोणत्या जागांबाबत चर्चा पूर्ण होऊ शकलं नाही हे सुद्धा अजून स्पष्ट झालेले नाही. तेव्हा आता बघूयात विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना भाजपमधील जागावाटप कधी पूर्ण होत युती जाहीर केली जाते.


रविवारी भाजप अध्यक्ष अमित शाह हे मुंबईत होते. पण यावेळी मात्र ते मातोश्रीवर गेले नाहीत. त्यामुळे आता युतीची भाजपला अधिक गरज नसल्य़ाची चर्चा होती. युतीबाबत आतापर्यंत अनेक फॉर्म्युले समोर आले आहेत. 



याआधी शिवसेनेच्या जागांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार करणार आहेत. नंतर ही यादी घेऊन मी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना दाखवून जागांचे ठरवू, असे सांगत युतीच्या जागावाटप तिढ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला होता.


शिवसेना १३५-१३५ च्या फॉर्म्युलावर ठाम असल्याचे सांगण्यात येत होते. तर भाजप शिवसेनेला ११० ते ११६ जागा देण्यास तयार असल्याचं देखील सुत्रांनी म्हटलं होतं. युती होणार की नाही, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, शिवसेना निम्या-निम्या जागावर अजूनही ठाम असल्याचे बोलले जात आहे.


विधानसभा निवडणुकीत महायुतीलाच पुन्हा यश मिळेल. महायुतीच सत्ता मिळवेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आता हा दावा किती खरा ठरेल हे युतीच्य़ा घोषणेनंतरच कळेल.