मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबईमध्ये भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या परिसरात कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अमित शहा कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात आणि युती संदर्भात त्यांची काय भूमिका असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोरेगावमधील नेस्को मैदानात यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या दौऱ्यात अमित शाह हे मातोश्रीवर जाणार का ? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भाजपाची जास्त गरज आहे. त्यामुळे यावेळेस युतीसाठी शिवसेनेतर्फे पुढाकार घेतला जाऊ शकतो. त्यामुळे अमित शहा मातोश्रीवर येण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपानं एक पाऊल मागे घेत शिवसेनेशी युती केली होती. नाणार इथला प्रकल्प रद्द करत शिवसेनेच्या अनेक अटी भाजपनं मान्य केल्या होत्या. लोकसभेची पालघरची जागाही भाजपाने शिवसेनेला दिली होती. 



आता गेल्या 4 महिन्यात युती नावाच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. तेव्हा भाजप 165 आणि सेना 105 असा विधानसभा निवडणुकीसाठीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजपाने शिवसेनेसमोर ठेवला आहे. शिवसेनेला हा फॉर्म्युला मान्य नाही, शिवसेना समसमान जागा वाटपाच्या मुद्द्यावर ठाम आहे. तेव्हा आता शिवसेनाने एक पाऊल घेतलं घेणं भाजपाला अपेक्षित आहे. शिवसेनेनं एक पाऊल मागे घेतलं तरच युती होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा पुन्हा एकदा भाजप माघार घेणार की शिवसेना ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.