वरळीच्या तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस
विश्राम तिडा पाडम, अभिजीत वामनराव बिचकुले आणि महेश पोपट खांडेकर या तीन उमेदवारांना नोटीस
मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा संघाकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. कारण ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आदित्य ठाकरेंच्या रुपाने प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे. शिवसेनेसाठी ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे. गेले अनेक दिवस या जागेची चाचपणी सुरु होती. कोणत्या प्रमुख पक्षाने आपला प्रबळ उमेदवार या ठिकाणी दिला नाही. तरीही अपक्ष उमेदवार आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध वरळीतून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. दरम्यान यातील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस धाडली आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम अंतर्गत ही नोटीस पाठविण्यात आली आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांनी आपला आर्थिक तपशिल निवडणूक आयोगाकडे सादर केला. यातून कोणत्या उमेदवाराकडे किती संपत्ती आहे याच्या चर्चा रंगल्या. यामध्ये 3 उमेदवारांनी निश्चित केलेल्या दैनिक खर नोंद वह्या तपासणीस सादर केल्या नाहीत. त्यामुळे विश्राम तिडा पाडम, अभिजीत वामनराव बिचकुले आणि महेश पोपट खांडेकर या तीन उमेदवारांना लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 77 नुसार नोटीस बजावण्यात आल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुषमा सातपुते यांनी दिली.