राहुल गांधींच्या सभेला मुंबई काँग्रेसच्या दिग्गजांची दांडी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारासाठी पहिल्यांच महाराष्ट्रात आले होते.
मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारासाठी पहिल्यांच महाराष्ट्रात आले होते. लातूर जिल्ह्यातील औसामध्ये पहिली सभा घेतल्यानंतर त्यांच्या दोन सभा मुंबईत झाल्या. मात्र या दोन्ही सभांना मुंबई काँग्रेसचे दोन नेते गैरहजर होते. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा आणि दुसरे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी राहुल गांधीच्या सभेला दांडी मारली.
गेल्या काही दिवसातील पक्षातील घडामोडींमुळे दोन्ही नेते नाराज असल्याची चर्चा आहे. संजय निरुपम यांनी तर काही दिवसांपूर्वी आपण काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचं म्हटलं होतं. मिलिंद देवरा यांच्या गैरहजेरीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून देवरा हे नाराज असल्याची चर्चा आहे. ३७० चा मुद्दा आणि त्यानंतर काही बाबतीत देवरा यांनी ट्विट करुन नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलं होतं. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याचीही चर्चा आहे. राहुल गांधीच्या सभेमुळे पक्षाच्या प्रचारापेक्षा पक्षातील धुसफूसची समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचं अध्यक्ष बनवण्यात आलं. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवरा यांनी लगेचच आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.