मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ दरम्यान प्रदेश काँग्रेसच्या तिकीट वाटपावरून मतभेद समोर आलेत. पक्षावर नाराज असलेले काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तर मुंबईच्या ३-४ जागा सोडल्या तर सर्वच काँग्रेसच्या उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त होण्याची भविष्यवाणी केलीय. तर दुसरीकडे आणखीन एका स्थानिक नेत्यानं काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांच्यावर तिकीट वाटपासाठी दलालीचा आरोप केलाय. विधानसभा निवडणुकीत प्रिया दत्त यांनी तिकीटं विकण्याचा धंदा केला तर त्यांचा भाऊ अभिनेता संजय दत्त याचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचाही आरोप या नेत्यानं केला. काँग्रेस नगरसेवक ब्रायन मिरांडा यांनी सोनिया गांधी यांना एक ई-मेल लिहून आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिया दत्त पुन्हा एकदा १७५ कलिंगा विधानसभेचं तिकीट विकण्यासाठी यशस्वी ठरल्या, असं आपल्या ई-मेलमध्ये मिरांडा यांनी म्हटलंय. या मतदारसंघातून जॉर्ज अब्राहम यांना काँग्रेसनं उमेदवारी दिलीय. १४ वर्षांपूर्वी अब्राहम यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला होता.



२०१२ पासून सलग दोनदा महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या मिरांडा यांनी केवळ प्रिया दत्त यांच्यावर नाही तर त्यांचा भाऊ संजय दत्त याच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. 'सुनील दत्त यांच्या मृत्यूनंतर या कुटुंबानं आपला सन्मान गमावलाय. तुम्हाला त्यांच्या भावाच्या (संजय दत्त) कारनाम्यांची माहिती असेलच. आजही त्याचे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत आणि मी हवेत गप्पा मारत नाही. जेव्हा गोष्टी समोर येतील तेव्हा तुम्हाला आपल्या निर्णयावर पश्चाताप होईल' असंही मिरांडा यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.