नारायण राणेंचा मुंबईतील कार्यकर्त्यांचा मेळावा रद्द
राणेंच्या रखडलेल्या भाजपा प्रवेशामुळे कार्यकर्ते अस्वस्थ
मुंबई : नारायण राणेंनी मुंबईत बोलवलेला कार्यकर्त्यांचा मेळावा रद्द करण्यात आला आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. राणेंच्या रखडलेल्या भाजपा प्रवेशामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांच्याशी राणे आज संवाद साधणार होते. मात्र आज मेळावा रद्द करण्यात आला. मेळावा रद्द करण्याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे असं राणेंनी म्हटलं होतं. तर राणेंचा योग्य वेळी निर्णय होईल असं मुख्यमंत्री सांगत होते. मालवणमध्ये अनेक राणे समर्थक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राणेंचा भाजपा प्रवेश हुकल्याने कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.
माझ्यामुळे युती आणखी भक्कम होईल. युती झाली की मी भाजपमध्ये प्रवेश करेन. मुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील, असे राणे यांनी म्हटले. तसेच माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा शुभ आहे. मी केवळ योग्य वेळेची वाट पाहत आहे. मुख्यमंत्री शिवसेनेच्या विरोधाला जुमानतील असे वाटत नाही. मात्र, माझा शिवसेनेला कोणताही विरोध नाही. कारण, युती झाली किंवा न झाली तरी माझा भाजपप्रवेश निश्चित असल्याचे राणे यांनी सांगितले.