मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा आज (मंगळवारी) संध्याकाळी शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून हजारो शिवसैनिकांची उपस्थिती या मेळाव्याला असणार आहे. विधानसभा निवडणूक प्रचाराचं रणशिंगही याच मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फुंकणार आहेत. 'विधानसभेवर भगवा फडकवणारच... हीच ती वेळ...' अशा आशयाचा फलक व्यासपीठावर लावण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा रोख विधानसभा निवडणुका असणार हे वेगळं सांगायची गरज नाही.


दरम्यान, ईडीच्या कारवाईवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधलाय. सत्तेचा आणि अधिकारांचा गैरवापर होऊ नये, असं उद्धव ठाकरेंनी भाजपाला अप्रत्यक्षपणे सुनावलंय. सामनाला दिलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात त्यांनी ईडी आणि सीबीआयच्या गैरवापराच्या मुद्यावर मित्रपक्ष असलेल्या भाजपाला खडे बोल सुनावलेत. सत्ता मिळाली म्हणून सुडाचं राजकारण करू नये असंही ते म्हणालेत. लोकशाहीत एकमेकांच्या विचारांचा आदर केला पाहिजे असंही त्यांनी सुनावलंय. दुसरीकडं पावसाळ्यात दोन तीन वेळा मुंबई तुंबण्याला त्यांनी मेट्रोच्या कामांना जबाबदार ठरवलंय. मुंबई तुंबण्याला मेट्रोशी संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्यामुळे आता ते आपल्या भाषणात कोणकोणते मुद्दे मांडणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलंय.