आदित्य ठाकरेंकडून सिद्धिविनायक दर्शनाने मतदान दिवसाची सुरुवात
आदित्य ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदीरात जाऊन दर्शन घेतले
मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९ च्या मतदानास सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. ढगाळ वातावरणातही राज्यभरात मतदारांचा उत्साह दिसत आहे. राज्यभरात दिग्गज राजकारण्यांचे भवितव्य आजच्या मतदानावर ठरणार आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. वांद्रे येथे ते थोड्याच वेळात सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावतील. त्याआधी त्यांनी सिद्धिविनायक मंदीरात जाऊन दर्शन घेतले आहे.
मतदानाला सुरुवात
विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. दिग्गजांसह ३ हजार २३७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे यंदाचे मतदान हे तोडीचे होणार आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज देखील सज्ज झालं आहे. राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदानकेंद्र असून राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करून मतदान होणार आहे.
नक्षलग्रस्त गडचिरोलीत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी विशेष हेलिकॉप्टरची व्यवस्था देखील करण्यात आलं आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे.मतदानाच्या पूर्वसंध्येला राज्यात पावसाचं धूमशान असून आजही पावसाचं सावट पाहायला मिळत आहे. पावसाचा परिणाम मतदानावर होणार का? अशी चिंता उमेदवारांना लागून राहिली आहे.
राज्यात एकूण ८ कोटी ९८ लाख मतदार आहेत. तर मतदानासाठी राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदानकेंद्र निर्माण करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच १ लाख ३५ हजार व्ही व्ही पॅट यंत्रांची सर्व २८८ मतदारसंघांमध्ये सुविधा पुरवण्यात आली आहे. तर सहा लाखांहून अधिक कर्मचारी आणि तीन लाख पोलीस मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत.