पक्षानं तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे यांची पहिली प्रतिक्रिया...
चौथ्या यादीतही नाव नसल्यानं तावडे नाराज होते, विनोद तावडे अपक्ष लढतील, अशी चर्चाही सुरु होती. पण...
मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९ साठी भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या चौथ्या यादीतही पक्षाचे आघाडीचे नेते विनोद तावडे यांचं नाव नसल्यामुळे त्यांचा पत्ता आता कट झाल्याचं समोर आलं. बोरिवली मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, यावेळी भाजपानं विनोद तावडे यांच्याऐवजी सुनील राणे यांना संधी देण्यात आलीय. आता तावडे काय भूमिका घेणार? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात असतानाच विनोद तावडे यांनी एक पत्रकार परिषद घेत यासंबंधी खुलासा केला.
तावडेंनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचं सांगितलं. चौथ्या यादीतही नाव नसल्यानं तावडे नाराज होते, विनोद तावडे अपक्ष लढतील, अशी चर्चाही सुरु होती. पण आपण अपक्ष लढणार नाही, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिलीय.
'पक्षानं तिकीट का नाही दिलं? याचं मी आत्मपरिक्षण करतोय... त्याबद्दल पक्षश्रेष्ठींशी चर्चाही करेल. पक्षाचं काही चुकलं असेल तर पक्षही त्यावर विचार करेल. पण आज निवडणुका तोंडावर असताना कुणाचं चुकलं, कुणाचं बरोबर? हा विचार करण्याची वेळ नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. संघपरिषदेचे संस्कार माझ्यावर आहेत, त्यामुळे मी राजकारणात स्वयंसेवक म्हणून काम करतो' असं म्हणत त्यांनी पक्षावर आपण नाराज नसल्याचं दर्शवलं.
'प्रथम देश, मग पक्ष आणि मग आपण हीच शिकवण आपल्याला संघाकडून मिळालीय. त्यामुळे तावडे पवारांना भेटले का? तावडे पक्ष सोडणार का? हा विचारसुद्धा माझ्या मनाला शिवत नाही आणि कुणी मला त्यांच्या पक्षात येण्यासाठी विचारुही शकत नाही. कारण संघ, परिषद, भाजपशी मी एकनिष्ठ आहे... आणि हे लोकांनाही माहित आहे' असं म्हणत काहीही झालं पक्षाशी आपण एकनिष्ठ राहणार अशी ग्वाहीच तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.