देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : माहीम विधानसभा मतदार संघ हा दक्षिण मध्य मुंबईतला एक अत्यंत महत्वाचा विधानसभा मतदार संघ आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून हा मतदार संघ ओळखला जातो. 2014 साली या मतदार संघातून शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे चार मुख्य पक्ष वेगवेगळे लढले होते. २०१४ मध्ये या मतदार संघातून शिवसेनेच्या सदा सरवणकर यांनी बाजी मारली होती. सदा सरवणकर यांना ४६ हजार मत मिळाली होती. शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे आणि आपण केलेल्या कामामुळे या मतदार संघातून शिवसेनेचा उमेदवारच पुन्हा निवडूण येणार असा दावा सदा सरवणकर यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मतदार संघात भाजपाकडे कार्यकर्ते नाहीत. इतक्या वर्षांमध्ये इथे आमची काम आहेत. त्यामुळे आमचाच आमदार होईल असे सदा सरवणकर यांनी म्हटले आहे. 2014 ला तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपा उमेदवाराला 33 हजार मत मिळाली होती. मात्र आता परिस्थितीत मोठा फरक झाला आहे. युती न झाल्यास भाजपाच माहिम विधानसभेत मतदार संघात झेंडा फडकवणार असा विश्वास स्थानिक भाजपा नेते व्यक्त करताहेत. 



या मतदार संघात युती झाली नाही तर आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजपाला आहे. भाजपा माहिम विधानसभा अध्यक्ष विलास आंबेकर यांनी भाजपा उमेदवाराच्या विजयाची खात्री दिली आहे. कधीकाळी माहीम हा काँग्रेसचा गड मानला जात होता. मात्र आता या मतदार संघात काँग्रेसचा बुरुज पूर्णपणे कोसळलाय. मात्र तरीही काँग्रेसला काहीतरी चमत्कार घडेल अशी आशा वाटतेय. 


बेरोजगारी,महागाई यामुळे सत्ताधाऱ्यांबद्दल जनतेमध्ये आक्रोश आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस राजन भोसले यांनी म्हटले आहे. एकूणच काय तर घोडा मैदान दूर नाही कोणाचा झेंडा माहिमवर फडकेल हे लवकरच स्पष्ट होईल. युती झाली नाही तर या मतदार संघात भाजपा विरुद्ध शिवसेना अशीच लढाई होणार यात शंका नाही.