मुंबई : दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी १० रुपयांत थाळीची घोषणा केली खरी, पण यानिमित्तानं शिवशाही सरकारच्या काळात सुरु झालेल्या आणि नंतर बंद पडलेल्या 'झुणका भाकर' योजनेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. विधानसभा निवडणुका म्हणजे लोकप्रिय घोषणा आणि त्यांचा सुकाळ असणारच. यंदा शिवसेना-भाजपा महाय़ुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला नसला तरी दसरा मेळाव्यात १० रुपयांत थाळीची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचबरोबर एक रुपयात आरोग्य तपासणीची घोषणाही केली. या निमित्तानं जनतेला पुन्हा झुणका भाकरीची आठवण झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९५ साली शिवसेना-भाजपाची सत्ता आली. त्यावेळी एक रुपयात 'झुणका भाकर' या योजनेची घोषणा त्यावेळच्या शिवशाही सरकारकडून करण्यात आली होती. मोठा गाजावाजा करत ही योजना सुरु करण्यात आली खरी, मात्र प्रत्यक्षात या निमित्तानं मोक्याच्या जागा शिवसैनिकांनी लाटल्याचा आरोप करण्यात आला. कालांतरानं 'झुणका भाकर केंद्र' केवळ नावाला उरलं... आणि थेट या ठिकाणी हॉटेलच सुरू केल्याचं पुढं आलं. यात मोठा भ्रष्टाचार केल्याचाही आरोप झाला. अखेरीस ही योजना आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आली. 



यानंतर शिवसेनेनं 'शिव वडापाव'च्या नावाने मराठी तरुणांना रोजगार देण्याचाही प्रयत्न केला, त्याला मुंबई शहर आणि परिसरात बऱ्यापैकी यश आलं. २०१४ च्या निवडणुकीत मोदी आणि हिंदुत्वाची लाट मोठी असल्यानं अशा लोकप्रिय घोषणा त्यावेळी करण्यात आल्या नव्हत्या. यंदा मात्र शिवसेनेला भाजपापेक्षा वेगळेपण दाखवण्यासाठी अशा घोषणांची पुन्हा आठवण आलीय. आता हे थाळीचं आमिष मतदारांच्या गळ्याखाली उतरणार का? हे निकालानंतरच कळेल.