मुंबई : युतीच्या सभांचा धडाका सुरू असताना आघाडी मात्र संथ पडल्याचं चित्र आहे. आघाडीची एकही संयुक्त सभा झाली नाही. राष्ट्रवादीकडून एकटे पवार जोमानं लढतायत... पण सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना महाराष्ट्रात फिरकावंसंही वाटलं नाही. 'महायुती'ची एकत्र सभा मुंबईत होत असताना, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची प्रचारातील पिछाडी स्पष्टपणे जाणवणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारखे मात्तबर महायुतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असताना, दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीतील काँग्रेस प्रचारात पिछाडीवर असल्याचं दिसतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रचारात काँग्रेस पिछाडीवर पडल्याचंच चित्र दिसतंय. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची एकही संयुक्त सभा झालेली नाही. सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांची एकही प्रचारसभा राज्यात झाली नाही. नाही म्हणायला राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी केवळ तीन सभा पार पडल्या. प्रदेशातील नेतेही आपापल्या मतदारसंघात अडकलेत. परंतु, यामुळे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचेही महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झाल्याचंच प्रकर्षानं दिसून आलं. 


काँग्रेसची ही स्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र प्रचारात चांगलाच जोर धरलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, धनुंजय मुंडे, जंयत पाटील, अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचा जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. विशेषत: शरद पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, या वयातही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय. 


महायुतीचं आव्हान असताना आघाडीतील हा विसंवाद स्पष्टपणे जाणवण्याइतपत आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचं महाराष्ट्राकडे असलेलं हे दुर्लक्ष राष्ट्रवादीला परवडण्यासारखं नाही. रणांगणात जोडीनं धावताना, एका साथीदाराची माघार राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीलाही पिढेहाटीवर नेणारीच ठरेल.